देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रियंकाची गगनभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2022 07:45 AM2022-04-10T07:45:00+5:302022-04-10T07:45:01+5:30
Nagpur News नागपुरातील प्रियंका खांडेकर हिला इंडियन आर्मीत लेफ्टनंट म्हणून आणि इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग अॉफिसर बनण्याची संधी मिळाली आहे.
नागपूर : जन्मजातच खाकीकडून मिळालेले बाळकडू तिला शिस्तप्रियता अन् देशसेवेचे ध्येय देणारे ठरले. त्यामुळे तिचे ध्येय निश्चित होते. ते गाठण्यासाठी तिने चिकाटी अन् सातत्य कायम ठेवले. त्याच बळावर सीडीएस तसेच एएफसीएटी हे दोन्ही अडथळे तिला लीलया ओलांडता आले. परिणामी दोन आठवड्यात तिची पहिल्यांदा इंडियन आर्मीत लेफ्टनंट म्हणून निवड झाली तर आता तिला इंडियन एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर बनण्याची संधी चालून आली. कोणत्याही पालकाचा ऊर आनंदाने भरून यावा, असा हा दुहेरी आनंद येथील सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) संतोष खांडेकर आणि त्यांच्या पत्नी शारदा यांच्या वाट्याला आला.
शारदा आणि संतोष खांडेकर यांची मुलगी प्रियंका हिचे प्राथमिक शिक्षण नागपुरात झाले. वडील पोलीस दलात असल्याने कर्तव्य तसेच बदलीची भिंगरी फिरत होती. त्यामुळे कधी वाशिम, कधी अमरावती तर कधी पुन्हा नागपूर असा शैक्षणिक प्रवास करणाऱ्या प्रियंकाने व्हीएनआयटीमधून २०१९ ला इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी. टेक केले. लगेच नोकरीच्या निमित्ताने लठ्ठ पगाराचे आमिष होते. मात्र, देशसेवेच्या ध्येयाने झपाटलेल्या प्रियंकाने ती ऑफर धुडकावून यूपीएससीच्या निमित्ताने दिल्ली गाठली. नंतर कोरोनाचा अडथळा आला परंतु जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रियंकाची आगेकूच सुरूच राहिली. कंबाईन डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस) परीक्षेत ती देशातून चौथी (एआयआर-४) आली. त्यामुळे तिला आर्मीत लेफ्टनंटची संधी मिळाली तर आता एएफसीएटीच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यात तिची एअर फोर्समध्ये फ्लाईंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.
पोलीस दलात आनंदीआनंद
प्रियंकाचे वडील संतोष खांडेकर हे अनेक वर्षांपासून शहर पोलीस दलात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. आता ते एसीपी म्हणून सेवा देत आहेत. त्यांच्या मुलीने हे गाैरवास्पद दुहेरी यश मिळवल्याची बातमी शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली अन् अवघ्या पोलीस दलात आनंदीआनंद सुरू झाला.
----