वर्षभरापासून अडकलीय पुरस्कार राशी अन् नाट्यगृहांचे भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 10:56 AM2021-02-11T10:56:46+5:302021-02-11T10:58:09+5:30
Nagpur News ऐन कोरोनाच्या काळात शासनाकडून कलावंतांना कोणतीही मदत मिळाली नाही. तेव्हा कलावंतांच्या हक्काचे पैसे तरी मिळावेत, या प्रतीक्षेत रंगकर्मी आहेत.
प्रवीण खापरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे घेण्यात आलेल्या ५९व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या प्राथमिक आणि अंतिम फेरी वर्षभरापूर्वीच आटोपल्या. मात्र, या स्पर्धातील विजेत्या नाट्यसंघांची पुरस्कार राशी व स्पर्धांचे आयोजन झालेल्या नाट्यगृहांचे भाडे अद्याप मिळालेले नाही. ऐन कोरोनाच्या काळात शासनाकडून कलावंतांना कोणतीही मदत मिळाली नाही. तेव्हा कलावंतांच्या हक्काचे पैसे तरी मिळावेत, या प्रतीक्षेत रंगकर्मी आहेत.
देशात आणि बहुधा जगात हौशी नाट्य स्पर्धांचे सलग आयोजन करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे आपल्या कलांचे संवर्धन करण्याच्या वृत्तीत महाराष्ट्राचे जगपातळीवर कौतुक होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाचे कलावंतांच्या बाबतीतील कार्य, कौतुकास पात्र नसल्याचे दिसून येते. कोरोनाचे कारण पुढे करून राज्य शासन आपल्या जबाबदारीपासून तोंड फेरत असल्याचेच स्पष्ट होत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य, दिव्यांग व व्यावसायिक अशा सात स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. २०१९-२० मध्ये या स्पर्धांचे हे ५९वे वर्ष होते. २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे या नाट्यस्पर्धा पार पडल्या नाहीत. तरीदेखील ५९व्या स्पर्धेचे पुरस्कार व नाट्यगृहांचे भाडे अजूनपावेतो पोहोचलेले नाहीत. विजेते नाट्यसंघ, वैयक्तिक पुरस्कार राशी व नाट्यगृहांचे भाडे मिळून साधारणत: दोन कोटी रुपये देणे लागत आहे. मात्र, हजारो कोटींचे व्यवहार करणाऱ्या शासनाकडे एवढी तोकडी रक्कम नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
साधारणत: सव्वा कोटी नाट्यगृहांचे बाकी
राज्याच्या महसुली विभागांनुसार स्पर्धांचे एकूण १९ केंद्रे निश्चित करण्यात आली होती. त्यात नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, पुणे, मुंबई, ठाणे, अ-नगर, औरंगाबाद, नाशिक, सांगली आदींचा समावेश होतो. त्या अनुषंगाने मराठी नाट्यस्पर्धांचे प्राथमिकचे १९ व अंतिमसाठी १ अशा २० व हिंदी, संस्कृत, संगीत व दिव्यांग स्पर्धेचे प्रत्येकी एक नाट्यगृहांचे असे मिळून २४ नाट्यगृहांचे जवळपास सव्वा कोटी रुपये भाडे अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना काळात नाट्यगृह पूर्णत: बंद होते. त्यामुळे, मिळकत बंद होती. आर्थिक अडचणीमुळे अनेक नाट्यगृहांनी कामगारांचीही कपात केली. अशा स्थितीत शासनाकडून किमान हक्काचे भाडे मिळण्याची अनेकांची अपेक्षा फोल ठरली. बालनाट्य स्पर्धेचे भाडे तात्काळ देण्यात आले होते, हे विशेष तर व्यावसायिक नाट्यस्पर्धा झालीच नाही.
नाट्यस्पर्धा पार पडल्याचा कालावधी
* मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी (१९ केंद्रांवर) : १५ नोव्हेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२०
* मराठी नाट्यस्पर्धेची अंतिम फेरी (औरंगाबाद) : ३ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२०
* बालनाट्य स्पर्धा (१० केंद्रांवर) : ३ ते १८ जानेवारी २०२०
* दिव्यांग बालनाट्य स्पर्धा (लातूर व नाशिक) : ३ ते १५ फेब्रुवारी २०२०
* संगीत नाटक स्पर्धा (इचलकरंजी) : १६ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२०
* संस्कृत नाट्य स्पर्धा (पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक) : १८ ते २६ जानेवारी २०२०
* हिंदी नाट्यस्पर्धा (पुणे, नागपूर, ठाणे, मुुंबई) : फेब्रुवारी २०२० ते जानेवारी २०२१ (टाळेबंदीमुळे वेळापत्रक लांबले.)
पुरस्कार राशी व नाट्यगृहांचे भाडे असे मिळून दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो मंजूर होऊन मार्चच्या अंतिम किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धक व नाट्यगृहांना त्यांची रक्कम टप्प्याटप्प्यात प्राप्त होईल. स्पर्धकांची अनामत रक्कम स्पर्धकांच्या खात्यात आधीच वळती झालेली आहे.
- बिभीषण चावरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय
...............