नागपूर पोलिसांची कृतिशील संवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:35 AM2020-04-22T00:35:13+5:302020-04-22T00:39:13+5:30

लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली फटकेबाजी अनुभवली असेल. त्यांच्याकडून अनेकांवर कठोर कारवाई होतानाही बघितले असेल. या लॉकडाऊनमध्ये पोलिसांचे दुसरेही रूप समाजाला बघायला मिळाले. ते म्हणजे पोलिसांत असलेली संवेदनशीलता.

Proactive sensitivity of Nagpur police | नागपूर पोलिसांची कृतिशील संवेदनशीलता

नागपूर पोलिसांची कृतिशील संवेदनशीलता

googlenewsNext
ठळक मुद्देसमन्वयकाच्या भूमिकेतून १५ लाख लोकांपर्यंत पोहचविली मदत१३२ सेवाभावी संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली फटकेबाजी अनुभवली असेल. त्यांच्याकडून अनेकांवर कठोर कारवाई होतानाही बघितले असेल. या लॉकडाऊनमध्ये पोलिसांचे दुसरेही रूप समाजाला बघायला मिळाले. ते म्हणजे पोलिसांत असलेली संवेदनशीलता. नागपुरात एकही माणूस उपाशीपोटी झोपणार नाही यासाठी नागपूर पोलीस झटत आहे. पोलिसांनी सामाजिक संघटनांना एकत्र करून समन्वयकाच्या भूमिकेतून १५ लाख लोकांना अन्नधान्य, धान्यवाटप व जीवनावश्यक वस्तू पुरविल्या आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतानाच लॉकडाऊनमुळे असंख्य नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यासोबतच जिल्ह्याची सीमाबंदी केल्यामुळे हजारो मजूर आहे तेथे अडकून पडले. या पार्श्वभूमीवर शासनाने निवासगृहे सुरु केली. परंतु हातावर पोट असलेल्या नागरिकांपुढे दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. सामाजिक जबाबदारी स्वीकारत विविध स्वयंसेवी संस्थांनी मदत सुरू केली. परंतु ही मदत एका विशिष्ट भागापुरतीच मर्यादित असल्यामुळे नागपूरचे अप्पर पोलीस महानिरीक्षक नीलेश भरणे यांच्या संकल्पनेतून सामाजिक संस्थांमध्ये समन्वय ठेवण्यसाठी ‘पोलीस वॉर रुम’ तयार करण्यात आली.
याद्वारे सामाजिक संस्थांच्या वितरणावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. तसेच शहरातील गरीब व गरजवंत वस्त्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये रेड, आॅरेंज व ग्रीन अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील नोंदणी केलेल्या १३२ संस्थांच्या मदतीची विभागणी करण्यात आली. या संस्थामार्फत दररोज ९५ हजार ते १ लाख लोकांपर्यंत शिजविलेल्या अन्नासह विविध साहित्यांचे वाटप होत आहे.

सायबर सेल बनले वॉर रुम
नागपूर पोलिसांचा सायबर सेल सामाजिक संस्थांसाठी वॉर रुम बनले आहे. त्यासाठी दोन सहायक पोलीस अधीक्षक, सात पोलीस कर्मचारी भुकेल्यांपर्यंत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी अविरत काम करत आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील मजूर आणि कामगार वर्गाची उपासमार होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी या संपूर्ण मानवी कार्यात समन्वयक बनण्याचे ठरविले. मदत करणाऱ्या संस्थांची यादी तयार करुन, त्यांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केले आणि प्रत्येक संस्थेला विशिष्ट भागाची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार भोजन व धान्याची गरज लक्षात घेऊन माहिती संकलित करण्याचे आणि संबंधित संस्थेला ती पोहचविण्याची जबाबदारी नागपूर पोलिसांनी उचलली आहे.

ही मदत कोरोना विरुद्धच्या लढ्यात निर्णायक ठरू शकेल
विशेष म्हणजे पोलीस या संपूर्ण मदत कार्याची नोंद ठेवत आहे. आजच्या घडीला दररोज एक लाख लोकांना मदत केली जात आहे. शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. तोपर्यंत पोलीस समन्वयकाच्या भूमिकेतून सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने कार्य सुरू ठेवणार आहे. राज्यात पहिल्यांदाच पोलीस विभागातर्फे मदतीचे काम होत आहे. कोरोना विरोधातील लढ्यात पोलिसांची ही मदत निर्णायक ठरु शकेल.

Web Title: Proactive sensitivity of Nagpur police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.