सरसंघचालकांच्या सुरक्षेमुळे स्वयंसेवकांची अडचण
By admin | Published: August 28, 2015 02:59 AM2015-08-28T02:59:35+5:302015-08-28T02:59:35+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना ‘झेडप्लस’ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.
भेटण्याची मोकळीकच नसल्याची खंत : नागरिकांना मन:स्ताप
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना ‘झेडप्लस’ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांच्याभोवती नेहमी ‘कमांडो’च्या सुरक्षेचे कडे असते आणि त्यामुळे सरसंघचालकांना भेटण्यास अडचण येत असल्याची खंत संघ स्वयंसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संघाच्या प्रचारकांना भेटण्याची मोकळीक असली तरी अगोदर असलेला मोकळेपणा अनेकदा मिळत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मोहन भागवत अनेक अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. त्यांच्यासकट संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ‘कमांडो’वर सोपविण्यात आली आहे.
सरसंघचालकांची कोंडी
डॉ.मोहन भागवत हे मोकळ्या स्वभावाचे असून स्वयंसेवकांशी, नागरिकांशी ते नेहमीच संवाद साधताना दिसून येतात. अनेकांची तर ते आवर्जून चौकशी करतात. सोबतच अनेकदा ते शाखेतील स्वयंसेवकांमध्ये मिसळतानाचे चित्रदेखील अनेकांनी अनुभवले होते. परंतु त्यांच्याभोवती सदैव सुरक्षेचे कडे असल्यामुळे त्यांनादेखील कुठे ना कुठे ‘प्रोटोकॉल’चे पालन करावे लागत आहे. कमांडो नागपुरात येण्याच्या काही दिवसअगोदर काही स्वयंसेवकांशी संवाद साधत असताना त्यांनी याबाबत संकेतदेखील दिले होते. आता पूर्वीप्रमाणे ते थेट लोकांमध्ये मिसळू शकत नसून याची त्यांनादेखील खंत आहे. जवळील काही पदाधिकाऱ्यांना त्यांनी ही बाब बोलूनदेखील दाखवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सदैव कमांडोंचा गराडा
नागपूर : भागवत नागपुरात संघ मुख्यालयात असो किंवा दौऱ्यावर, त्यांच्याभोवती सदैव कमांडोंचा गराडा असतो. त्यामुळे त्यांना सहजपणे भेटता येणे फार कठीण झाले आहे. संघ मुख्यालयात नेहमी येणारे पदाधिकारी किंवा क्षेत्र, प्रांत प्रचारकांना भेटण्याची परवानगी देण्यात येते. परंतु स्वयंसेवकांना किंवा नागरिकांना जर सरसंघचालकांना भेटायचे असेल तर नक्कीच अडचणीचा सामना करावा लागत आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहून नागरिकदेखील एकदम त्यांच्याजवळ जाण्यास धजावत नाहीत. पूर्वी संघ मुख्यालयात असलेला मोकळेपणा राहिलेला नाही, अशी माहिती मुख्यालयातीलच सूत्रांनी दिली आहे.
सुरक्षेचे ‘प्रोटोकॉल’ पाळणे आवश्यक आहे, परंतु यामुळे सरसंघचालक सामान्यांपासून दूर होत आहेत, असे मत एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले.
कमांडोंची अरेरावी
नव्या सुरक्षेअंतर्गत सरसंघचालकांच्या ताफ्यातील वाहनेदेखील वाढली आहेत. साधारणत: डॉ.भागवत संघ मुख्यालयात असले की त्यांना महालातील अरुंद रस्त्यांवरूनच जावे लागते. अशावेळी त्यांच्या ताफ्यातील ‘पायलट व्हॅन’ सायरन देऊन वाहनांना सूचना देते. परंतु महालातील रस्त्यांवर मागील येणाऱ्या गाड्यांना जागा देणे फारच कठीण असते. अशा स्थितीत जर समोरील गाडी बाजूला झाली नाही तर कमांडो चक्क अरेरावीची भाषा वापरतात. काही नागरिकांना बडकस चौक परिसरात याचा अनुभवदेखील आलेला आहे. सरसंघचालकांची गाडी मागे असल्याने ते या प्रकारापासून अनभिज्ञ असतात. नागरिकांना मात्र नाहक मन:स्तापाचा सामना करावा लागतो आहे.