खडकारी मोहल्ल्यात समस्यांचाच बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:21+5:302021-03-06T04:07:21+5:30
नागपूर : शहरातील नागरिकांना विविध सुविधा मिळत आहेत. परंतु मध्य नागपुरातील खडकारी मोहल्ल्यात नागरिकांना विविध समस्यांसाठी संघर्ष करावा लागत ...
नागपूर : शहरातील नागरिकांना विविध सुविधा मिळत आहेत. परंतु मध्य नागपुरातील खडकारी मोहल्ल्यात नागरिकांना विविध समस्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. या वस्तीची लोकसंख्या सहा हजार आहे. खूप जुनी वस्ती असूनही या भागातील नागरिकांना गडरलाईन, नादुरुस्त कूपनलिका, खराब रस्ते आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महानगरपालिकेने या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
गडरलाईनमुळे नागरिक त्रस्त
गडरलाईन वारंवार चोक होत असल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहे. गडरलाईन चोक झाल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर वाहते. त्यामुळे दुर्गंधी पसरते. डासांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा निवेदने देऊनही महानगरपालिकेने नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने काहीच कारवाई केली नाही. या भागातील कूपनलिकाही नादुरुस्त आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून महापालिकेने त्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.
रस्त्यांची अवस्था बिकट
खडकारी मोहल्ल्यातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. बहुतांश अंतर्गत रस्त्यांच्या मधोमध गडरलाईनची पाईपलाईन आणि चेंबर आहेत. त्यामुळे अचानक रस्त्याच्या मधोमध उंच भाग आल्यामुळे वाहनचालकांचे अपघात होत आहेत. ब्रेकर खाली नाल्या असल्यामुळे रस्ता समांतर करण्याची गरज आहे. या भागातील गडरलाईनची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. सोबतच या भागात कचरा उचलणारे हातठेले येत नसल्यामुळे बराच काळ कचरा साचून राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रस्त्यावर अतिक्रमण, गार्डन नाही
या भागात अरुंद रस्ते आहेत. रस्त्यावर काही नागरिकांनी तबेला टाकण्यामुळे वाहतुकीसाठी अतिशय कमी रस्ता उरतो. अशा स्थितीत अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही नागरिकांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्यामुळेही अपघात होत आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. मुलांना खेळण्यासाठी या भागात मैदान नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. तसेच या भागातील स्ट्रीट लाईट आठवड्यातून दोन वेळा बंद राहत असल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरलेला असतो. महापालिकेने या भागातील स्ट्रीट लाईट सुरु राहण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आहे.
गडरलाईन दुरुस्त करावी
‘गडरलाईन नेहमी चोक होते. रस्त्यावर घाण पाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरते. त्यामुळे गडरलाईनची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आहे.’
-अक्षय बहारघरे, नागरिक
कूपनलिका दुरुस्त कराव्या
‘खडकारी मोहल्ल्यातील कूपनलिका नादुरुस्त आहेत. उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे नादुरुस्त कूपनलिका दुरुस्त करण्याची गरज आहे.’
-मोरेश्वर वाकोडीकर, नागरिक
हातठेले उपलब्ध करून द्यावे
‘रस्ते अतिशय अरुंद असल्यामुळे या भागात कचरागाडी येऊ शकत नाही. त्यासाठी हातठेले कचरा उचलण्यासाठी येतात. परंतु हातठेल्यांची संख्या खूप कमी असल्यामुळे नियमित कचरा उचलण्यात येत नाही. महापालिकेने नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी.’
-धनराज उमरेडकर, नागरिक
रस्त्यांची दुरुस्ती महत्वाची
‘मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अंतर्गत रस्त्यावर मधोमध गडरलाईनचे चेंबर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होतो. त्यामुळे या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.’
-दीपाली पाटील, नागरिक
स्ट्रीट लाईट बंद राहतात
‘आठवड्यातून दोन दिवस स्ट्रीट लाईट बंद राहतात. रस्त्यावर अंधार पसरतो. त्यामुळे महिलांना रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाण्याची भीती वाटते. त्यामु़ळे या भागातील स्ट्रीट लाईट दुरुस्त करण्याची गरज आहे.’
-नागमणी वेलमुरे, नागरिक
.................