गावाचे शहर झाले; पण समस्यांवरची धूळ अजूनही कायम, विकासाचा अजेंडा अजूनही कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 11:56 AM2023-03-16T11:56:25+5:302023-03-16T11:58:04+5:30

वानाडोंगरी नगरपरिषदेच्या समस्यांची पोलखोल

Problems in Wanadongri persist, development agenda only on paper nagpur | गावाचे शहर झाले; पण समस्यांवरची धूळ अजूनही कायम, विकासाचा अजेंडा अजूनही कागदावरच

गावाचे शहर झाले; पण समस्यांवरची धूळ अजूनही कायम, विकासाचा अजेंडा अजूनही कागदावरच

googlenewsNext

मंगेश व्यवहारे/ मनोज झाडे

नागपूर : २०१६ साली हिंगणा तालुक्यातील वानाडाेंगरी ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला. गत सहा वर्षात वानाडोंगरीचा मोठ्या प्रमाणात विस्तारही झाला. नवीन ले-आउट, फ्लॅट स्कीमची भर पडली. वानाडोंगरी गावाचे शहर झाले असले तरी येथील समस्यांवरच अद्यापही धूळ कायम आहे.

गत चार महिन्यात राज्य सरकारने जिल्ह्यातील सात मोठ्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतींना दर्जा दिला. यातील तीन ग्रामपंचायती नागपूर शहराला लागून आहेत. मात्र सहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेचा दर्जा मिळालेल्या वानाडोंगरीच्या नागरी समस्या किती सुटल्या याचा आढावा ‘लोकमत’ चमूने घेतला. यात वानाडोंगरीत विकासाचा अजेंडा अजूनही कागदावरच असल्याचे दिसून आले.

लोकसंख्या वाढली; पण...

नागपूर महापालिकेच्या हद्दीपासून अवघ्या ३ ते ४ किलोमीटर अंतरावर वानाडोंगरी नगरपरिषदेची सीमा आहे. ग्रामपंचायतीचा दर्जा काढून २१ ऑक्टोबर २०१६ला नगरविकास विभागाने वानाडोंगरीला नगरपरिषदेचा दर्जा बहाल केला. २०११ च्या जनगणनेनुसार वानाडोंगरीची लोकसंख्या ३८ हजार होती; आता ती ८० हजारांवर आहे. पण येथे चांगल्या नागरी सुविधा पुरविण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

काय आहे वानाडोंगरीत?

हिंगणा एमआयडीसी, लता मंगेशकर हॉस्पिटल, वायसीसी इंजिनिअरिंग कॉलेज, शालिनीताई मेघे हॉस्पिटल, डी मार्ट हे वानाडोंगरीमध्ये व आसपास आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्गाने वानाडोंगरीत निवारा शोधला. रिअल इस्टेट क्षेत्राने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याने मोठमोठ्या फ्लॅट स्कीम येथे उभ्या राहिल्या. नोकरदार, कामगार, किरकोळ व्यावसायिक वर्गाचे प्राबल्य या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. १२०७.५७ हेक्टर क्षेत्रफळ वानाडोंगरीचे असून, हिंगणा रोडवरील इलेक्ट्रिकल झोनपासून रायपूर ग्रामपंचायतीपर्यंत वानाडोंगरी नगरपरिषदेचा परिसर आहे.

६ वर्षांत केवळ ७० टक्के रस्त्यांची कामे

ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्याने विकासाची स्वप्ने येथील नागरिकांनी रंगविली होती. रस्ते, पाणी, गटरलाइन, सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या, कचऱ्याची समस्या, क्रीडांगण, आरोग्याच्या सोयीसुविधांचा विस्तार - विकास होईल, अशी अपेक्षा येथील नागरिकांना होती. सहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेने वानाडोंगरीच्या विकासाचा अजेंड जो तयार केला होता, तो आताही कागदावरच दिसतो. ६ वर्षांत ७० टक्के रस्त्यांची कामे झालीत; पण रस्त्याची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत.

पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तेवढेच

ग्रामपंचायत असताना जेवढे नळ कनेक्शन होते, तेवढेच अजूनही आहे. अविकसित लेआउटच्या समस्या कायमच आहेत. गटरलाइनचा कुठलाही प्रोजेक्ट नगरपरिषदेच्या अजेंड्यावर नाही. सांडपाण्याच्या नाल्या घाणीने तुडुंब भरून वाहत आहेत.

डम्पिंग यार्डचा प्रश्न कायमच

कचरा घरोघरी उचलला जातो; पण डम्पिंग यार्डचा प्रश्न सुटलेला नाही. नगरपरिषदेची स्वत:ची शाळा, रुग्णालय नाही. अजूनही नगरपरिषदेतील काही वस्त्यांना आठवड्यातून एक दिवस पाणी पोहोचतेय.

वानाडोंगरी नगरपरिषद होऊन सहा वर्षे झाली; पण विकासाचा कोणताही दृष्टिकोन नाही. वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात लेआउट पडले, लोकांनी प्लॉट घेऊन गुंतवणूक केली; पण त्या लेआउटमध्ये रस्ते, पाणी यांसारख्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. विकासशून्य नगरपरिषदेमुळे घाण, दुर्गंधी आणि रोगराईने नागरिकांच्या जिवाचा खेळखंडोबा केला आहे. या सहा वर्षांत वस्त्यांचा विकास झाला नाही; पण नगरसेवकांचा मात्र चांगलाच विकास झालेला दिसतो.

- दीपक नासरे, सामाजिक कार्यकर्ते, वानाडोंगरी 

Web Title: Problems in Wanadongri persist, development agenda only on paper nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.