नागपुरातील पट्टे वाटपाची प्रक्रिया ठप्पच : उद्दिष्ट दहा हजारांचे वाटप झाले तीन हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:42 AM2019-11-01T00:42:06+5:302019-11-01T00:43:50+5:30
राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ पर्यंत नागपूर शहरातील १० हजार झोपडपट्टीवासी कुटुंबांना मालकी पट्टे वाटप करण्याचे निर्धारित केले होते. परंतु ऑक्टोबर संपला तरी जेमतेम तीन हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने सप्टेंबर २०१९ पर्यंत नागपूर शहरातील १० हजार झोपडपट्टीवासी कुटुंबांना मालकी पट्टे वाटप करण्याचे निर्धारित केले होते. परंतु ऑक्टोबर संपला तरी जेमतेम तीन हजार झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्यात आले. गेल्या महिनाभरापासून पट्टेवाटपाची प्रक्रिया ठप्प आहे. त्यातच नासुप्रने ऑगस्ट २०१९ पर्यंत प्राप्त अर्जधारकांनाच पट्टे वाटप करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानतंर आलेले अर्ज महापालिकेकडे पाठविण्यात येणार आहे. नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया सुरू असल्याने तांत्रिक अडचणीमुळे नासुपचे पट्टेवाटप रखडले आहे.
ऑक्टोबर अखेरपर्यंत महापालिके च्या जागेवरील ११०० झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले, तर नासुप्रच्या जागेवरील १९०० झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. शहरातील झोपडपट्ट्या प्रामुख्याने नासुप्र, नझुल व महापालिकेच्या जागेवर वसलेल्या आहेत. या तिन्ही विभागाच्यावतीने पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाची प्रक्रिया सेलच्यावतीने राबविली जात आहे. यात १३ झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. ऑक्टोबरअखेरीस महापालिकेने ११०० झोपडपट्टीधाकांना पट्टे वाटप केले आहे. नासुप्रच्या जागेवरील वस्त्यांतील १३२९ झोपडपट्टीधारकांची रजिस्ट्री ऑगस्ट २०१९ पर्यंत झाली होती. आता ही संख्या १९०० पर्यंत गेली आहे. नझुलच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचा सर्वे महापालिकेने केला आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. नझुलच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना अद्याप पट्टे वाटप सुरू करण्यात आलेले नाही.
राज्य सरकारने झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटपाची घोषणा केल्यानंतर नासुप्रची यंत्रणा कामाला लागली होती. यासाठी विभागस्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कामाला गती आली होती. मात्र नासुप्र बरखास्तीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पट्टे वाटपाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. महापालिका व नझुलच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण केले. परंतु याला गती देण्याची गरज आहे. नझुलच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप प्रक्रिया संथच आहे.
पट्टे वाटप तातडीने करा
नासुप्र बरखास्तीच्या निर्णयाचा पट्टे वाटप प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता आहे. सरकारच्या मालकी पट्टे वाटपाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला खीळ बसू नये, यासाठी नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवावी. यासाठी शासनाने निर्देश द्यावे, अशी मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांनी केली आहे.