२० लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:53+5:302021-07-09T04:06:53+5:30
भांडेवाडी कचरामुक्तच्या मार्गावर : बायो-माईनिंगचा यशस्वी प्रयोग लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे नागपूर शहरातील कचरा ...
भांडेवाडी कचरामुक्तच्या मार्गावर : बायो-माईनिंगचा यशस्वी प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे नागपूर शहरातील कचरा साठविला जातो. येथील २० एकर जागेत मागील अनेक वर्षापासून २० लाख मेट्रिक टन कचरा साठविण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. यावर बायो-माईनिंगच्या माध्यमातून प्रक्रिया केली जात आहे. वर्षभरात ४.५० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षात उर्वरित १५.५० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याने भांडेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२०१९ मध्ये झिग्मा ग्लोबल एन्व्हायर्न सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडला भांडेवाडी येथील १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायो माइनिंग प्रक्रिया करण्याचा १०० कोटींचा कंत्राट दिला आहे. २०२२ पर्यंत बायो-माइनिंग ही प्रक्रिया करावयाची आहे. ही प्रक्रिया करून कचरा पुनर्वापरासाठी व कंपोस्टिंगसाठी पाठविला जातो. मार्च २०२२ पर्यंत १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती मनपाच्या स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले.
.......
स्मार्ट सिटी अंतर्गत ४० कोटीचा प्रकल्प
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत घनकचरा व्यवस्थानासाठी १४८.७७ कोटींची तरतूद आहे. यातून ४० कोटींचा बायो-माईनिंग प्रकल्प राबविला जात आहे. यात भांडेवाडी येथील १० लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या बाबतची निविदा मंजूर झाली आहे. लवकरच या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.
....
-भांडेवाडी येथे साचलेला कचरा -२० लाख मेट्रिक टन
-४.५० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया
-मार्च २०२२ पर्यंत भांडेवाडी कचरामुक्त होणार
-स्मार्ट सिटी अंतर्गत १० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया
.....
प्रकल्पामुळे काय होणार?
-भांडेवाडी परिसरातील नागरिकांची दुर्गंधीपासून मुक्तता
-डम्पिंग यार्डची २० एकर जागा खाली होणार
-पर्यावरण संवर्धनाला मदत
- कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती
-प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या मातीचा शेतीसाठी वापर