मिरवणुकीला लागले गालबोट
By admin | Published: April 12, 2017 02:11 AM2017-04-12T02:11:48+5:302017-04-12T02:11:48+5:30
हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला जिल्ह्यात गालबोट लागले.
खाप्यात तरुणाचा खून : कामठीत विजेच्या धक्क्याने मृत्यू
खापा/कामठी : हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला जिल्ह्यात गालबोट लागले. सावनेर तालुक्यातील खापा येथे सोमवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेवरून दोन गटात वाद उद्भवला आणि याच वादातून तरुणाचा खून करण्यात आला. त्यामुळे खाप्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांचा पोलीस प्रशासनावर असलेला रोष पाहता मृत तरुणावर मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. कामठी शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान तरुणाच्या हाती असलेल्या झेंड्याचा स्पर्श रेल्वेच्या उच्च दाब वाहिनीला झाला आणि तरुणाला जोरदार विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.
सावनेर तालुक्यातील गुमगाव माईन्सच्यावतीने सोमवारी सायंकाळी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक होती. रात्री ७.३० वाजताच्या सुमारास ही मिरवणूक खापा शहरातील नवीन वस्तीत पोहोचली. मिरवणुकीतील डीजेवरून दोन गटात वाद उद्भवला. त्यात दुसऱ्या गटातील तरुणांनी पंकज गुलाब ऊर्फ गोपाल जुनघरे (२२, रा. नवीन वस्ती, खापा) यास मारहाण ेकेली. खापा पोलिसांनी मध्यस्थीनंतर वाद मिटला. काही वेळाने तरुणांनी महात्मा गांधी प्राथमिक शाळेच्या मागे पंकजला पुन्हा मारहाण केली. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे पोलीस ठाण्यावर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शेरखाने यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली होती. (प्रतिनिधी)
सहा संशयितांना घेतले ताब्यात
या प्रकरणात खापा पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात गणेश यादव, रा. गुमगाव माईन, शुभम बावनकुळे, रा. नवीन वस्ती, सतीश जत्रे, अखिलेश गडपाल, निखील यादव, गुड्डू पंतिया, सर्व रा. गुमगाव माईन याचा समावेश आहे. या सहा जणांसह गुड्डूच्या मित्राने पंकजला मारहाण केली. ‘धक्का का मारला’ यावरून त्याला मारहाण करण्यात आली. त्यात पंकज बेशुद्ध पडला व नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि १४३, १४७, १४९, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास खाप्याचे ठाणेदार प्रवीण वांगे करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांना निवेदन
मृत पंकजच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची खापा पोलीस ठाण्यात भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी तसेच सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केली. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात येईल तसेच त्यांना योग्य ती शिक्षा मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पंकजच्या कुटुंबीयांना दिले.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
पंकज जुनघरे हा ट्रकवर मजुरी करायचा. वडिलांच्या निधनानंतर तो आई, बहीण व दोन भावांसोबत राहायचा. तो सर्वात लहान होता. नागरिकांच्या भावना विचारात घेत नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले. मंगळवारी दुपारी मृतदेह खाप्यात आणल्यानंतर सायंकाळी ४ वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खाप्यात शीघ्रकृती दलासह अतिरिक्त पोलीस तैनात केले होते. वरीष्ठ पोलीस अधिकारी हजर होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खाप्याला भेट दिली. त्यांच्या या आकस्मिक भेटीमुळे पोलीस अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अर्ध्या तासाच्या दौऱ्यात त्यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला.
फुटबॉलपटूचा मृत्यू
कामठी : हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मोटरसायकल रॅलीत सहभागी तरुणाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना कामठीच्या रमानगरात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
वैष्णव ऊर्फ इसू सदन यादव (२३, रा. गवळीपुरा, कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. भाजीमंडी येथील हनुमान मंदिरातून सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास निघालेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये तो सहभागी झाला होता. ही रॅली बोरकर चौक, गोयल टॉकीज चौक, गांधी चौक, जयस्तंभ चौकमार्गे बालाजी मंदिर येथे जात होती. दरम्यान डीजे असलेल्या वाहनात वैष्णव लोखंडी रॉडमध्ये झेंडा घेऊन उभा होता. ही रॅली रमानगर रेल्वे फाटक ओलांडत असताना वैष्णवच्या हातातील झेंड्याचा रेल्वेच्या उच्च दाबाच्या वीज तारांना स्पर्श झाला. वीज तारांना झेंडा लागताच स्फोटासारखा आवाज होऊन वैष्णवचा डावा हात भाजून तो खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी नोंद केली आहे.
या घटनेत मृत्यू झालेला वैष्णव हा नॅशनल फुटबॉल क्लबचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून परिचित होता. फुटबॉलमध्ये त्याने नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अनेक स्पर्धा त्याने गाजविल्या. दोनच दिवसांपूर्वी पुणे येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळून तो परत आला होता. तो माधवराव वानखेडे महाविद्यालयात बी.पी.ई. द्वितीय वर्षाला शिकत होता. त्याच्यापश्चात आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. (तालुका प्रतिनिधी)