संत्रा प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 06:42 AM2019-01-22T06:42:35+5:302019-01-22T06:45:18+5:30
नाशिकच्या द्राक्षांप्रमाणे नागपूरच्या संत्र्यांचादेखील दर्जा जागतिक पातळीचा आहे. द्राक्ष प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करण्यात आले आहे.
नागपूर : नाशिकच्या द्राक्षांप्रमाणे नागपूरच्या संत्र्यांचादेखील दर्जा जागतिक पातळीचा आहे. द्राक्ष प्रक्रिया प्रकल्पांचे उत्पादन शुल्क माफ करण्यात आले आहे. विदर्भात जर संत्रा प्रक्रिया प्रकल्प आला तर द्राक्षांप्रमाणे या प्रकल्पांचेदेखील उत्पादन शुल्क माफ करण्यात येईल व ही शुल्कमाफी २०२५ सालापर्यंत असेल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित ‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी थाटात समारोप झाला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. रेशीमबाग मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित,‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र क0ुकरेजा, ‘ऑरेंज ग्रोव्हर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष पी. जी.जगदीश, सचिव हरजिंदरसिंह मान, ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे (सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) संचालक डॉ. एम. एस. लदानिया प्रामुख्याने उपस्थित होते. मागील ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात निश्चित वाढ झाली व येथील मार्गदर्शनामुळे नैसर्गिक संकटांपासून पीकदेखील वाचविता आले. द्राक्ष उत्पादक कंपन्या संत्र्यावरदेखील प्रक्रिया करणारे उद्योग विदर्भात टाकण्याच्या विचारात आहेत. संत्र्याच्या ‘पल्प’पासून विविध उत्पादन तयार करून त्यांची निर्यात करण्यात येईल. ‘लोकमत’ने आता विदर्भात संत्रा प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी पुढाकार घ्यावा. या प्रकल्पाबाबत तीन महिन्यांत प्रस्ताव दिला तर सर्वात जास्त विजेची ‘सबसिडी’देखील देण्यात येईल व मोफत सौर ऊर्जादेखील देण्यात येईल. सोबतच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष निधीचीदेखील तरतूद करण्यात
येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. जोपर्यंत देशातील शेतकरी मजबूत होणार नाही तोपर्यंत देश आणि अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकणार नाही.‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ हा संत्रा उत्पादक शेतकºयांना दिशा दाखविणारा ठरला आहे, असे विजय दर्डा यांनी सांगितले. यावेळी संत्रा प्रक्रिया उद्योग व शेतीमध्ये मौलिक योगदान देणारे वैज्ञानिक, संस्था व प्रगतिशील शेतकºयांचा गौरव करण्यात आला.
>‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ची ‘कॅबिनेट’मध्ये चर्चा
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे संपूर्ण जगाचे लक्ष नागपूरकडे वेधल्या गेले. राज्यात अनेक महोत्सव साजरे होतात. मात्र प्रथमच एखाद्या महोत्सवाची मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व याला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेदेखील याला समर्थन मिळाले. विजय दर्डा यांच्या पुढाकारामुळे हे होऊ शकले, असे कौतुकोद्गार मंत्री बावनकुळे यांनी काढले.