कारखान्यांमध्ये उत्पादन ठप्प, कामगारांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:07 AM2021-04-22T04:07:55+5:302021-04-22T04:07:55+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर यासह तालुका स्तरावर औद्योगिक वसाहती आहेत. कोरोना काळात राज्यात आणि राज्याबाहेर ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी, हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर यासह तालुका स्तरावर औद्योगिक वसाहती आहेत. कोरोना काळात राज्यात आणि राज्याबाहेर फिनिश मालाचा पुरवठा बंद असल्याने लघु व मध्यम उद्योगांची स्थिती दयनीय असून काही कारखान्यांमध्ये उत्पादन ठप्प आहे. मोठ्या उद्योगांचीही स्थिती उत्तम नाही. पण भांडवलाच्या आधारावर त्यांची वाटचाल सुरू आहे. उत्पादन ठप्प झाल्याने कामगारांची उपासमार होत असल्याची माहिती आहे.
यंदा २० टक्के कामगार मूळ गावी परतले
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील सर्व कामगार हे लगतच्या दहा गावांतील आहेत. त्यामुळे येथील उद्योगातील कामगार परत जाण्याचा प्रश्नच नाही. पण बऱ्याच कारखान्यांमध्ये उत्पादन बंद असल्याने मूळचे मध्य प्रदेशातील जवळपास २० टक्के कामगार परत गेले आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशात स्थिती चांगली नसल्याने तेथील कामगार परत गेले नाहीत. उद्योग पुन्हा सुरू झाले तर त्याचा उत्पादनावर परिणाम होणार नाही. उत्पादन बंद असतानाही सर्वच उद्योजक हे कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून आर्थिक मदत करीत आहेत. ही स्थिती लवकरच निवळणार आहे, त्यामुळे स्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद कानडे यांनी व्यक्त केला.
हीच स्थिती हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज आणि कळमेश्वर इंडस्ट्रीज वसाहतीत आहे. या वसाहतीत लगतच्या गावांतील लोक येथील उद्योगात कामाला आहेत. देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे वस्तू विक्रीची दुकाने बंद आहेत. त्याचा परिणाम फिनिश वस्तूंच्या मागणीवर झाला आहे. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याचे हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर आणि कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अमर मोहिते यांनी सांगितले.