महिला स्वयं सहाय्यता गटांची उत्पादने गुणवत्तापूर्णच; जि.प.अध्यक्ष मुक्ता कोकड्डे
By गणेश हुड | Published: February 17, 2024 06:34 PM2024-02-17T18:34:39+5:302024-02-17T18:34:51+5:30
ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांचा दर्जा हा गुणवत्तापूर्णच असतो.
नागपूर: ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांचा दर्जा हा गुणवत्तापूर्णच असतो. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मोठी बाजारपेठ आज या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. महिलांनी मालाच्या विक्रीसाठी सरस प्रदर्शनांसह फेसबूक, युट्युब या साधनांचाही वापर करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी शनिवारी केले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित अतिरिक्त महालक्ष्मी सरसच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मुक्ता कोकड्डे बोलत होत्या.
व्यासपीठावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उद्घाटक रुचेश जयवंशी, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे,विभागीय उपायुक्त विकास कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक शितल कदम, उपसंचालक महेश कारंडे उपस्थित होते. नागपूर मध्ये महालक्ष्मी सरसचे आयोजन करून एक विक्रीची मोठी संधी महिलांना मिळाली आहे. महिलांनी लोणची आचार व पापड या पुरता आपला व्यवसाय मर्यादित न ठेवता राहता कापड उद्योग, कलाकसुरीच्या वस्तू, विविध शोभेच्या वस्तू, ज्वेलरी अशी अनेक उत्पादने तयार करीत आहेत.प्रदर्शनाला नागपूर शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास मुक्ता कोकड्डे यांनी यावेळी व्यक्त केला.
नागपूर जिल्ह्यामध्ये अभियानाच्या माध्यमातून महिलांनी प्रशिक्षण घेवून स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत. भिवापूर तालुक्यात उत्पादक गट स्थापन करून प्रसिद्ध भिवापूरची मिरची हे उत्पादन उत्तम लेबलिंग पॅकेजिंग करून नागरत्न या ब्रँड खाली त्यांची विक्री बाजारपेठेत केली जात आहे. हिंगणा तालुक्यातील महिला हायड्रोपोनिक या नव तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्यावर भाजीपाल्याचे उत्पादन आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय विस्तारित करीत असल्याचे मत सौम्या शर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. अवंतिका लेकुरवाळे यांनी महिला सर्वच क्षेत्रात पुढे येत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर यांनी मानले. ही प्रदर्शनी २६ फेब्रुवारीपर्यंत राहणार असून येथे महिला बचत गटांचे विविध उत्पादनाचे ३०० स्टॉल लावण्यात आले आहे.
१५ लाख महिला लखपती
जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, उमेद अभियान आता राज्य, विभाग आणि जिल्हा स्तरावर प्रदर्शन भरविण्यासारख्या उपक्रमासोबतच ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. येत्या वर्षभरातच महाराष्ट्रात १७ लाख महिला लखपती करण्याचा आराखडा कृती आराखडा तयार आहे. यापैकी १५ लाख महिला लखपती होण्याचे उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. उत्पादनांची विक्री व्हावी यासाठी ॲमेझॉन फ्लिपकार्ट या ऑनलाईन माध्यमांचा वापर देखील महिला करीत आहेत आणि त्यावर आपले उत्पादन भारतातच नव्हे तर विदेशात देखील विक्री करीत आहेत.