प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’चा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2022 10:10 PM2022-11-07T22:10:23+5:302022-11-07T22:34:25+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (स्वायत्त ) मराठी विभागाच्या अभ्यासक्रमात प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (स्वायत्त ) मराठी विभागाच्या अभ्यासक्रमात प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. सत्र २०२२-२३ पासून एम. ए. मराठीच्या दुसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना ‘वैचारिक मराठी साहित्य’ या अभ्यासपत्रिकेत चार्वाक हे पुस्तक आता अभ्यासता येणार आहे.
नव्या विचारांच्या तरुण वाचकांमधील वैचारिक मंथनासाठी ‘चार्वाक’ हे पुस्तक एक महत्त्वाचे संसाधन ठरले आहे. ‘चार्वाक’ मध्ये लोकायत या धर्मपरंपरेचे आणि चार्वाक पंथाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत. या पुस्तकाची दिशा वर्तमान काळातील धर्म, नीती, अर्थ, युद्ध, शिक्षण, विज्ञान, राजकारण आणि जीवनमूल्यांच्या क्षेत्रातील समस्यांचा वेध घेणारी आहे.
तसेच जगाच्या इतिहासात धर्म, श्रद्धा कसे अस्तित्वात आले, विषमता आणि शोषण धर्माचाच एक भाग कसे बनले, माणसाचं आयुष्य सुखकारक करण्यासाठी विचारसरणी कशा उदयाला आल्या, पुढे विज्ञानाने काय दिलं, भारतात वैदिक, सांख्य, जैन, बुद्ध या ज्ञान परंपरांचं चार्वाकाच्या संदर्भात काय स्थान आहे, अशा प्रश्नांची अत्यंत नेमकी, टोकदार आणि प्रासादिक शैलीत उत्तरं शोधण्याचा प्रयत्न प्रा. द्वादशीवार यांनी केला आहे.