आंबेडकरी आणि प्राध्यापक संघटनेतील आवाज कायमचा थांबला; प्रा. सतेश्वर मोरेंचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:54 PM2021-03-02T22:54:48+5:302021-03-02T22:55:49+5:30
नुटा संघटनेचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठ प्राध्यापकांच्या अनेक समस्यांना तडीस नेण्यासाठी जीवाचे रान केले होते.
नागपूर - आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, विचारवंत, लेखक प्रा. सतेश्वर मोरे यांचे संध्याकाळी निधन झाले, ते महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे कार्यकारणी सदस्य तसेच नुटा संघटनेचे सहसचिवही होते, संध्याकाळी साडेपाच वाजता नागपूर येथील न्यूक्लिअर हॉस्पिटल येथे त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रचंड धक्का तर बसलाच पण विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राध्यापकांचा एक आश्वासक आधारवड कायमचा कोसळला असल्याची भावना निर्माण झाली आहे.
नुटा संघटनेचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी महाविद्यालय व विद्यापीठ प्राध्यापकांच्या अनेक समस्यांना तडीस नेण्यासाठी जीवाचे रान केले होते. प्रा.सतेश्वर मोरे हे आरडीआयके महाविद्यालय, बडनेरा येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळींना त्यांचा कायम आधार राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर त्यांनी अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आणि वेगळ्या चर्चासत्रांमध्ये केलेला आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारधारेचे ते एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. नुटा संघटनेत सुरुवातीपासूनच त्यांनी समर्पितपणे कार्य केलेले आहे. नुटाच्या सहसचिव पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी बी.टी भाऊ देशमुख यांच्यासोबत नुटा आणि एमफुक्टोच्या कार्याला जणू वाहूनच घेतले होते. त्यांची निधनाची वार्ता ऐकून आंबेडकरी चळवळीतील आणि नुटा संघटनेतील अनेकांना मोठा धक्का बसला.
सार्वजनिक जीवनात प्रा.सतेश्वर मोरे सरांनी प्रागतिक विचारांची कायम पाठराखण केलेली आहे. त्यांचा मृदू , ऋजू स्वभाव हा प्रत्येकाला त्याच्या त्यांच्या मैत्रभावनेत बांधून घेणारा होता.त्यांच्या जाण्यामुळे मोरे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. माणसाचे असे अकस्मात निघून जाणे फारच वेदनादायी असते. नुटा संघटना मोरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. नुटा आणि एमफुक्टो च्या वतीने प्रा.सतेश्वर मोरे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे अशा शब्दात नुटाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी दु:ख व्यक्त केली आहे.