संगीताचे गाढे अभ्यासक अप्पासाहेब इंदूरकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:51 PM2019-03-15T13:51:14+5:302019-03-15T13:52:09+5:30
गायन, वादन, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असा बहुविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविलेले, संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचे शुक्रवारी पहाटे देहावसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गायन, वादन, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असा बहुविध क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटविलेले, संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर यांचे शुक्रवारी पहाटे देहावसान झाले. ते ९५ वर्षांचे होते.
अप्पासाहेब इंदूरकर यांचे नाव जरी कोणी उच्चारले तरी त्यांचे शिष्य प्रथम कानाला हात लावतात. विदर्भाच्या सांगीतिक क्षेत्रात अत्यंत सन्मानजनक, गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे अप्पासाहेब इंदूरकर. गायन, तबला वादन, हार्मोनियम वादन, बंदिशींची निर्मिती, सुगम संगीताच्या रचनांची निर्मिती असे त्यांचे चौफेर कार्य राहिले आहे. त्यामुळे केवळ गायकच नाही तर वादक आणि अभ्यासकांनाही वेळोवेळी अप्पासाहेब इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाची गरज भासत आली आहे आणि अप्पासाहेबांनी प्रत्येकवेळी आपल्या विद्यार्थ्यांना भरभरून देण्याचा वसा चालवला आहे.
अप्पासाहेबांनी पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून अनेक वर्ष बँकेत नोकरी केली. पण म्हणून त्यांची संगीतावरची निष्ठा कमी झाली नाही. दररोज नित्यनेमाने त्यांचा रियाज चालायचा. संगीतावर असलेली गाढ श्रद्धा आणि अजोड अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी गायन, वादनात प्राविण्य प्राप्त केले. त्याचे अनेक कार्यक्रम झाले. अनेक मोठ्या शास्त्रीय गायकांसोबत त्यांच्या मैफली रंगल्या. संगीताचा एकीकडे रियाज, अध्ययन सुरू असतानाचा त्यांनी अध्यापनाच्या कार्यलाही स्वतला वाहून घेतले. शिकवण्यातला नेमकेपणा, तळमळ, संगीताप्रती असलेले त्यांचे प्रेम यामुळे सर्व वयोगटातील विद्यार्थी त्यांच्याकडे आकृष्ट होऊ लागले. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. आज अशी परिस्थिती आहे की, अप्पासाहेब नागपूरच्या शास्त्रीय व सुगम संगीतातील विद्यार्थी आणि कलाकारांच्या गुरूस्थानी जाऊन बसले आहेत.
अप्पासाहेबांच्या सांगीतिक विचारांवर उस्ताद अमीर खाँ साहेबांचा चांगलाच प्रभाव आहे. हा प्रभाव ते स्वत: मान्य करतात आणि जपतातही. उस्ताद अमीर खाँ साहेबांचे सुगम संगीतातील लालित्य व शास्त्रीय संगीतातील बौद्धिक बाजू अप्पासाहेब इंदूरकर यांनी कौशल्याने सांभाळली आहे. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदनाला त्यांनी दिलेली नवी चाल विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. अनेक मोठ्या गायकांना त्यांनी हार्मोनियमची संगत केली आहे. आडा चौताल हा त्यांचा विशेष आवडीचा ताल आहे. यात विविध लयीतील त्यांचे चमत्कृतीपूर्ण मुखडे रसिकांना विशेष भावत आले आहेत. त्यांनी निर्मिलेल्या मधुप्रिया रागातील काही रचनाही प्रसिद्ध आहेत.