बोगस बियाणे विक्रीतून कंपन्यांची नफाखोरी
By admin | Published: July 10, 2016 01:53 AM2016-07-10T01:53:57+5:302016-07-10T01:53:57+5:30
विदर्भातील काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी बाजारात सर्रास बोगस बियाणे विक्री करून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची
पाच कंपन्यांचा समावेश : हजारो शेतकऱ्यांचा घात
जीवन रामावत ल्ल नागपूर
विदर्भातील काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी बाजारात सर्रास बोगस बियाणे विक्री करून हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कृषी विभागाने या सर्व कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत परीक्षण केले असता हा भंडाफोड झाला आहे. या कंपन्यांमध्ये कावेरी सीड्स, मे. दप्तरी अॅग्रो प्रा. लि. सेलू, यशोदा सीड्स, कंपनी हिंगणघाट,रायझिंग सन सीड्स, नागपूर आणि स्वत: शासनाच्या महाबीज कंपनीचा समावेश आहे.
यापैकी कावेरी सीड्स कंपनीने कापूस आणि इतर सर्व कंपन्यांनी धान बियाण्याची विक्री केली आहे. विशेष म्हणजे,‘लोकमत’ने मागील १५ दिवसांपूर्वीच रायझिंग सन या कंपनीच्या बोगस धान बियाण्याचा भांडाफोड केला होता. मात्र कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी त्यावेळी थातूरमातूर कारवाईचा दिखावा करून, त्या कंपनीला पाठीशी घातले होते.
माहिती सूत्रानुसार मागील काही दिवसांत कृषी विभागाकडे बोगस धान बियाण्याच्या हजारो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना परस्पर दुसरे बियाणे देऊन त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशाप्रकारे या बियाणे कंपन्यांचा सर्वत्र तांडव सुरू असताना कृषी विभाग मात्र मूग गिळून बसला आहे. कृषी विभागाच्या कागदावर ७ जुलैपर्यंत केवळ ४० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असून, विभागातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शिवाय या सर्व शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी करून, त्याची पेरणी केली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतावरील बियाण्यांची उगवणच झालेली नाही. यामुळे अगोदरच नापिकी आणि दुष्काळाच्या चक्रात अडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचा आता पुन्हा या कंपन्यांनी घात केला आहे.
खटले दाखल करणार
या सर्व कंपन्यांनी आणि बियाणे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या सर्व कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने नापास (फेल) झाले आहेत. त्यामुळे संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या आणि त्यांचे बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध थेट न्यायालयात खटले दाखल केले जाणार आहेत. यात संबंधित पाच बियाणे उत्पादक कंपन्यांसह अहेरी येथील प्रकाश कृषी सेवा केंद्र, मनोज कृषी सेवा केंद्र, भडाळा येथील नरेंद्र कृषी सेवा केंद्र, शुभम कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे.
- एस.पी. गावंडे
विभागीय गुणनियंत्रण अधिकारी