समाजाची प्रगती आरक्षणातून नव्हे तर नवी दृष्टी देण्यातून : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 22:36 IST2019-09-16T22:32:34+5:302019-09-16T22:36:45+5:30
समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने अखिल माळी समाज महाअधिवेशनाचे उद्घाटन करताना नितीन गडकरी, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य. सोबत उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, अशोक मानकर, बाळासाहेब शिवरकर, कृष्णकांत इंगळे, वसंतराव मालदुरे, अशोक मानकर, संस्थाध्यक्ष अरूण पवार आदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील शोषितांना आरक्षण मिळावेच, मात्र समाजाची प्रगती त्यातून होते हे चूक आहे. तर समाजातील माणसाकडून मिळणाऱ्या नव्या दृष्टीतून समाजाची प्रगती होते. महात्मा फुले यांनी अखिल मानव समाजाला हीच नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात अखिल माळी समाज महाअधिवेशन पार पडले. त्या उद्घाटनप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासह माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कृष्णकांत इंगळे, माजी आमदार वसंतराव मालदुरे, डॉ. केशवराव यावलकर, माजी आमदार अशोक मानकर, संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब चिकाटे, शेषराव उमप, प्रकाश मौर्य, अशोक मानकर, संस्थाध्यक्ष अरुण पवार आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, महापुरुष कुण्या एका समाजाचे नसतात. त्यांचे अनुकरण संपूर्ण समाज करीत असतो. सामाजिक संघटनांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे. सामाजिक विकासाच्या संकल्पनेची त्रिसूत्री त्यांनी मांडली. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास यातून समाजाने मोठे व्हावे. समाजाच्या विकासासाठी समाजातील माणसांनी पुढे यावे. जात महत्त्वाची नसून व्यक्तीचे काम महत्त्वाचे असते. येत्या काळामध्ये ज्ञान ही मोठी शक्ती राहणार आहे, त्यामुळे महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करा, असे आवाहन त्यांनी केले.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले, समाजाची एकजूट महत्त्वाची असते. कोणतेही सामाजिक कार्य एकजुटीतूनच सफल होते. नागपुरातील माळी समाजाच्या मेळाव्यातून एकजुटीचा प्रत्यय आल्याचे सांगून त्यांनी या आयोजनाचे कौतुक केले. सध्या निवडणुकीचा काळ असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. समाजाच्या विकासासाठी हे आवश्यक असले तरी आपली मूल्ये आणि समाजपुरुषांची शिकवण कायम राखण्याची गरज आहे.
प्रास्ताविकातून प्रा. अरुण पवार यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. समाजाला राजकीय प्रतिनिधित्वाची गरज असून समाजाच्या एकसंघतेचीही अपेक्षा व्यक्त केली. महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध मागण्याही त्यांनी मांडल्या. यावेळी माजी आमदार वसंतराव मालदुरे, बाळासाहेब शिवरकर, प्रकाश मौर्य आदींची भाषणे झाली. डॉ. केशवराव यावलकर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. महाअधिवेशनाला महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.