विधानसभेत ‘लोकसत्ता’चा निषेध
By admin | Published: December 19, 2014 12:43 AM2014-12-19T00:43:28+5:302014-12-19T00:43:28+5:30
अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्तांना जाहीर झालेल्या पॅकेजसंदर्भात ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाची भाषा ही निषेधार्हच आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री म्हणाले, त्या अग्रलेखाची भाषा हीन
नागपूर : अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्तांना जाहीर झालेल्या पॅकेजसंदर्भात ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखाची भाषा ही निषेधार्हच आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत व्यक्त केले. शिवाय वृत्तपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. जोपर्यंत दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्ही घाला घालीत नाहीत, तोपर्यंत तुमचे स्वातंत्र्य मर्यादित आहे. भारतीय राज्यघटनेमध्येच ही स्वातंत्र्याची मर्यादा घालून दिलेली आहे याची जाणीवही त्यांनी यावेळी करुन दिली.
त्या अग्रलेखावरून गुरुवारी विधानसभेत चांगलेच वादळ उठले. या अग्रलेखाद्वारे शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला असून त्यांचा निषेध नोंदविण्यात यावा, अशी भावना संतप्त सदस्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे. त्या पोशिंद्याची टिंगळटवाळी करणारा लेख ‘बळीराजाची बोगस बोंब’ या शीर्षकांतर्गत छापण्यात आला. हा अतिशय संतापजनक प्रकार असून सभागृहाने त्याचा निषेध करावा, अशी मागणी केली. आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुले आहोत. शेतकऱ्यांच्या नावाने आम्ही निवडून जातो, ही बाबही खरी आहे, परंतु त्याचा अशाप्रकारे अपमान करणे हे संतापजनक आहे.
शिवसेनेचे विजय औटी यांनी संपादकाकडून शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करून निषेधाचा ठराव मांडला. यावेळी काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला. छगन भुजबळ म्हणाले, सर्व शेतकरी हे ‘कुबेर’ आहे, हे म्हणणे योग्य नाही. एखाद शेतकरी श्रीमंत असू शकतो, परंतु सरसकट सर्वांनाच श्रीमंत म्हणणे योग्य नाही. अग्रलेखामध्ये जी भाषा वापरली ती अतिशय वाईट आहे. कलावंतांबाबतही यात अपशब्द वापरले आहेत. भाजपाचे आशिष शेलार म्हणाले, मी निषेध करणारा लेख पाठविला होता. तो छापून आला, परंतु त्याचा आशयच बदलण्यात आला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, दागिने हे महिलांचे स्त्रीधन म्हणून ओळखले जाते. प्रतिकूल परिस्थितीत ते दागिने गहाण ठेवून आपले काम भागविण्याची शेतकऱ्यांमध्ये एक पद्धत आहे. परंतु अग्रलेखामध्ये शेतकऱ्यांच्या पत्नींच्या दागिन्यांचा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्याचे काम करण्यात आल्याने त्याचा निषेध झालाच पाहिजे, अशी मागणी केली.
सर्व पक्षीय सदस्यांचा संतप्त भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी हा आत्महत्या करतो, त्यासाठी तशी परिस्थिती कारणीभूत ठरते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असेल, चारही बाजूंनी तो त्रस्त झाला असेल तरच तो आत्महत्या करीत असतो.
अशाप्रसंगी त्या शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास देण्याची भावना ठेवणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सुद्धा हीच भावना ठेवण्याची गरज आहे. प्रसिद्धी माध्यमांनी राजकीय नेत्यांवर टीका केली तरी चालेल. तो त्यांचा अधिकार आहे. तो अधिकार अबाधित आहे. यासंबंधात निषेध ठराव आदी गोष्टी या वेगळ्या आहेत. परंतु अग्रलेखाची भाषा हीन आहे. वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याला कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. परंतु या भाषेचा मात्र निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)