नागपुरातील मंदिरात अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजक कपडे घालून येणाऱ्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 07:17 PM2023-05-26T19:17:15+5:302023-05-26T19:17:59+5:30
Nagpur News अंगप्रदर्शन करणारे, तोकडे किंवा उत्तेजक कपडे घालून मंदिरात येणारास मनाई करण्याची भूमिका महाराष्ट्र मंदिर महांसघाने घेतली आहे.
नागपूर : अंगप्रदर्शन करणारे, तोकडे किंवा उत्तेजक कपडे घालून मंदिरात येणारास मनाई करण्याची भूमिका महाराष्ट्र मंदिर महांसघाने घेतली आहे. राज्यातील मंदिरात यापुढे वस्त्रसंहिता लागू करण्यात यावी, अशी मागणीही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या संबंधाने आज धंतोलीतील श्री गोपाळकृष्ण मंदीरात बैठक घेण्यात आली. बैठकीत श्री गोपाळकृष्ण मंदीर धंतोली, श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदीर, बेलोरी (सावनेर), श्री दुर्गा माता मंदीर हिल टॉप, श्री बृहस्पती मंदीर कान्होलीबारा या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता आजपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र मंदीर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकारांना दिली.
शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयाप्रमाणेच काही मंदीर, मशिद, चर्च आणि गुरुद्वारा तसेच प्रार्थनास्थळे, न्यायालय आणि पोलीस दलात वस्त्रसंहिता लागू आहे. ते लक्षात घेता मंदिराचे पावित्र्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी मंदिरात भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे घनवट म्हणाले. त्याचसाठी बैठक अन् पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वस्त्रसंहितेसाठी सर्वत्र व्यापक अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर,धंतोलीतीळ श्री गोपाळकृष्ण मंदीर, बेलोरी सावनेरचे श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदीर, हिल टॉपचे श्री दुर्गा माता मंदीर आणि कान्होलीबारा येथील श्री बृहस्पती मंदीरात आजपासूनच वस्त्रसंहिता लागू झाल्याचे घनवट यांनी सांगितले.
मंदिराबाहेर फलक
मंदिरात कुणीही अंगप्रदर्शन करणारे, तोकडे आणि उत्तेजक कपडे घालून येऊ नये, अशी सूचना करणारे फलक नागपूर शहर आणि जिल्ह्यातील उपरोक्त मंदिराबाहेर लावण्यात आले आहे. बैठकीला प्रसन्न पातुरकर, आशुतोष गोटे, श्री बृहस्पती मंदीर कान्होलीबाराचे विश्वस्त रामनारायण मिश्र, श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिराचे दिलीप कुकडे आदींची उपस्थिती होती.
-----