राज्य तोडण्याची भाषा बोलणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 08:51 PM2018-05-04T20:51:13+5:302018-05-04T20:51:49+5:30
महाराष्ट्र सरकारमध्ये मोठमोठी पदे भोगायची, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, शासकीय व्यवस्था भोगायच्या आणि विदर्भाच्या नावावर राज्य तोडण्याची भाषा बोलायची, अशांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र सरकारमध्ये मोठमोठी पदे भोगायची, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, शासकीय व्यवस्था भोगायच्या आणि विदर्भाच्या नावावर राज्य तोडण्याची भाषा बोलायची, अशांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव यांनी केली आहे.
देशाचे नेतृत्वा महाराष्ट्राने करावे, यासाठी शिवसेनेची धडपड आहे. त्यासाठी राज्याच्या सीमेवरची गावे महाराष्ट्रात जोडण्यासाठी सातत्याने लढा देत आहे. अशात विदर्भाच्या विकासाच्या नावावर महाराष्ट्राला तोडण्याची भाषा अॅड. श्रीहरी अणे, माजी पोलीस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती आणि काही वकील मंडळी करीत आहे. विदर्भाच्या आंदोलनातील काही वकील मंडळी सरकार क्षेत्र, प्राधिकरण, महापालिका, नगरपालिका, बँका, कृषी, श्रमविभाग अशा सर्व शासकीय व अशासकीय व्यवस्थेवर पॅनलवर कार्य करीत आहे. ही मंडळी राज्याच्या सर्व सुखसोई, वेतन, भत्ते याचा लाभ मिळवित आहे. त्यांना पॅनलवरून काढून, त्यांची चौकशी करून, राजद्रोहाची कारवाई होणे गरजेचे आहे. विदर्भाच्या मागासलेपणाला त्या-त्या वेळेचे राज्यकर्ते जबाबदार आहे. विकासात भेदभाव, असमतोलपणा असल्यामुळे राज्य तोडण्याची भाषा योग्य नाही. आपले हक्क मिळविण्यासाठी ‘मतांचा’ अधिकार वापरून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. प्रबीरकुमार चक्रवर्तीसारखे लोक पदावर असताना काहीच करू शकले नाही, आता वेगळा विदर्भ पाहिजे म्हणतात हे चुकीचे आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांची गय आता शिवसेना करणार नाही, आम्हीसुद्धा अखंड महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा प्रकाश जाधव यांनी दिला. पत्रकार परिषदेला किशोर पराते, रमेश मिश्रा, रमेश बक्षी, डॉ. रामचरण दुबे, मंगेश कडव उपस्थित होते.
विदर्भाच्या चाब्या भाजपाच्या हाती
भाजपाचे काही आमदार वेगळ्या विदर्भाची मागणी करीत, दबाव निर्माण करीत आहे. आज विदर्भाच्या विकासाच्या चाब्या भाजपाच्या हातात आहे. विदर्भातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारी, सिंचनाचे प्रश्न, औद्योगिक विकास भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी साधावा, असा टोला जाधव यांनी हाणला.