नागपूरच्या औद्योगिक क्षेत्र बुटीबोरीत ‘बीईएल’चा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:14 AM2018-07-27T10:14:31+5:302018-07-27T10:20:03+5:30
मोरेश्वर मानापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुमारे १४०० हेक्टरवर नव्याने तयार होत असलेल्या विस्तारित बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात लष्करी दलासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तयार करणारी भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) २०० एकर जागेवर प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. जागेसंदर्भात २७ जुलैला मुख्यमंत्री आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती आहे.
कंपनीचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरात उभारणी होणार आहे. ‘बीईएल’चे देशात अनेक प्रकल्प आहेत. कंपनी लष्करी दलासाठी संरक्षणविषयक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करते. लष्करी दलाला कोस्टल आणि बॉर्डरवर लागणारी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, शस्त्र शोधून काढणारी यंत्रणा, आकाश मिसाईल सिस्टिम आदींसह अन्य उपकरणांच्या निर्मितीत कंपनीचा हातखंडा आहे. नागपूर प्रकल्पातही या उपकरणांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या उपकरणांचा उपयोग देशात होणार आहे. शिवाय विदेशातही निर्यात करण्यात येणार आहे.
नागपूर हे देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे ‘बीईएल’ने प्रकल्पासाठी नागपूरची निवड केली आहे.
प्रकल्पासाठी २०० एकर जागेची गरज नसली तरीही सुरक्षेच्या कारणांमुळे कंपनीने एवढ्या जागेची मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीने जागेचा प्रस्ताव नागपुरातील पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे सोपविला आहे.
जागेबाबत मुंबईत होणाऱ्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर प्रकल्पाचा मार्ग खुला होणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील या क्षेत्रातील अभियंते आणि तंत्रज्ञांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
‘बीईएल’ सारखे मोठे प्रकल्प बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आल्यास त्यावर अवलंबून असलेल्या लहान कंपन्यांना काम मिळेल, शिवाय रोजगार निर्मितीत वाढ होईल. या क्षेत्रात मोठ्या आॅटोमोबाईल इंडस्ट्रीज सुरू व्हाव्यात, अशी मागणी बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनची अनेक वर्षांपासूनची आहे. ‘बीईएल’ या मोठ्या कंपनीपाठोपाठ अन्य उद्योगही या क्षेत्रात येतील.
नितीन लोणकर, अध्यक्ष,
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.
‘बीईएल’ने विस्तारित बुटीबोरी इंडस्ट्रीज क्षेत्रात २०० एकर जागेचा प्रस्ताव मान्सून सत्रात दिला आहे. त्यावर वरिष्ठ स्तरावर निर्णय होणार आहे. त्यानंतरच जागा कंपनीला देणार आहे. विस्तारित बुटीबोरीत पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. सर्वच कामे झाली आहे. या कंपनीमुळे नवीन उद्योगांकडून या क्षेत्रात जागेची मागणी वाढणार आहे.
- संगीतराव, क्षेत्रीय अधिकारी,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.