नागपुरातील मुख्य बस स्थानकाला बसपोर्ट बनविण्याचा प्रकल्प रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 09:58 AM2021-06-28T09:58:32+5:302021-06-28T10:02:10+5:30
Nagpur News उपराजधानी नागपुरातील बस स्थानकाला नवे रूप मिळून बसपोर्ट बनविले जाणार होते. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र मागील दोन वर्षापासून काम थंड बस्त्यात आहे.
वसीम कुरेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उपराजधानी नागपुरातील बस स्थानकाला नवे रूप मिळून बसपोर्ट बनविले जाणार होते. त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र मागील दोन वर्षापासून काम थंड बस्त्यात आहे. आतापर्यंत जेमतेम २५ टक्केच काम पूर्ण झाले असले तरी अपूर्ण कामामुळे खर्चात मात्र वाढ झाली आहे.येथील गणेशपेमधील बसस्थानकच्या डाव्या बाजूला पाईपपासून बनविलेल्या शेडचा ढाचा उभारून ठेवला आहे. त्यावर अद्यापही शेड लावलेले नाही. या बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या कामाला २०१८ मध्ये प्रारंभ झाला होता. प्रवाश्याची वाढती संख्या, गर्दी लक्षात घेऊन नव्याने १० आधुनक प्लॅटफार्म उभारले जाणार होते. यात पार्सल रूम, नवी स्वच्छतागृहे, रेस्टॉरेंट आदींचा समावेश होता. हा प्रकल्प जवळपास १० कोटी रुपयांचा होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराला बिलाची रक्कम न मिळाल्याने काम खोळंबले आहे. दीड महिन्यांपूर्वी कंत्राटदाराला काही रक्कम बरीच विलंबाने मिळाली होती. काही कामे केली असली तरी प्लॅटफार्मसारखे काम या रकमेतून करता आले नाही. राज्याच्या उपराजधानीमधील या बसस्थानकावरील खड्डेही अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. डेपो कार्यालयाच्या भिंतीला जागोजागी भगदाड पडले आहेत.
एकंदर, आधुनिक होण्याएवजी हे बसस्थान पुन्हा कमजोर बनत चालले आहे. अपुऱ्या स्वच्छतेमुळे प्रवाश्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.. शेड कमी असल्याने पावसात भिजण्याची वेळ प्रवाश्यांवर आली
आहे.