गोसेखुर्द धरणावर प्रकल्पग्रस्तांची धडक

By admin | Published: November 28, 2014 01:02 AM2014-11-28T01:02:06+5:302014-11-28T01:02:06+5:30

२५ वर्षांचा काळ उलटूनही महाराष्ट्र शासन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व उपजीविकेचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी हजारो प्रकल्पग्रस्तांनी

Projector hit on Gosekhurd dam | गोसेखुर्द धरणावर प्रकल्पग्रस्तांची धडक

गोसेखुर्द धरणावर प्रकल्पग्रस्तांची धडक

Next

उपजीविकेच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष
नागपूर : २५ वर्षांचा काळ उलटूनही महाराष्ट्र शासन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व उपजीविकेचा प्रश्न सोडवू शकलेले नाही. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी हजारो प्रकल्पग्रस्तांनी गोसेखुर्द धरणावर ताट-वाटी,पाटी, धुटी व घागरी घेऊन धडक दिली आणि निदर्शने केली.
वैनगंगा नदीवर गोसेखुर्द गावाजवळ साकारण्यात आलेल्या राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पात शेती घरे बुडाल्याने हजारो कुटुंबे बेघर व बेरोजगार झाली आहेत. शासनाने प्रकल्पावर व पुनर्वसनावर कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी समस्या कायमच आहेत. नवीन गावठाणातील पुनर्वसन स्थळी उपजीविकेचा प्रश्न आ वासून पुढे आला आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज यासारख्या मूलभूत नागरी सुविधा तातडीने पुरविण्यात याव्यात, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्यावतीने संयोजक विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मेंढा गावी एकत्र येऊन दुपारी १ वाजता हजारोंच्या संख्येतील मोर्चाला सुरुवात झाली. पाथरी, भालची, पेंढरी, नवेगाव, मेंढा, सिर्सी, गिरोळा, चिंचखेडा, आंभोरा, जीवनापूर, सौदंड, नेरला, जामगाव, पांजरेपार, गोहली, बोरगाव आदी गावातील प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. मोर्चात प्रकल्पग्रस्तांनी ताटी-वाटी-धुटीच्या गजरात घोषणाबाजी केली.
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना उपजीविकेसाठी प्रशिक्षण, रोजगार, व्यवसाय, नोकरी देण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त कल्याणकारी योजना तयार करावी व त्यासाठी आर्थिक अनुदान विषयक तरतूद करण्यात यावी. मासेमारी करण्याचा कायदेशीर अधिकार मिळावा व प्र्रकल्पग्रस्तांसाठी जलाशय आरक्षित करण्यात यावा, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त युवकांना रोजगार व वृद्धांना पेन्शन योजना सुरू करावी, आदी मागण्या मोर्चादरम्यान करण्यात आल्या. संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वातील मोर्चात विठोबा समरित, सरपंच रिना भुरे, दादा आगरे, समीक्षा गणवीर, सोमेश्वर भुरे, वामन सेलोकर, लक्ष्मीकांत तागडे, प्रकाश मेश्राम, किशोर समरित, काशिनाथ सहारे, विनोद शेंडे आदींसह हजारो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Projector hit on Gosekhurd dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.