शहरात प्री-पेड मीटरचा भडका; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळला
By मंगेश व्यवहारे | Published: June 12, 2024 01:50 PM2024-06-12T13:50:07+5:302024-06-12T13:51:01+5:30
या माध्यमातून ग्राहकांच्या खिश्यातून हजारो कोटी रुपये वसूल केले जाणार आहे.
नागपूर : शहरात प्री-पेड मीटरच्या विरोधात चांगलाच भडका उडाला असून, बुधवारी व्हेरायटी चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून प्री-पेड मीटर रद्द करण्याची मागणी करण्यात आली. समाजातील कुठल्या घटकाशी चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलवून प्री-पेड मीटर लावल्या जात आहे. या माध्यमातून ग्राहकांच्या खिश्यातून हजारो कोटी रुपये वसूल केले जाणार आहे.
या विरोधात नागपुरात प्री-पेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीतर्फे जनाक्रोश अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून व्हेरायटी चौकात प्री-पेड मीटरच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. समितीचे सदस्य आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. तसेच प्री-पेड मीटर रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनकांनी फडणवीस यांचा पुतळ्या जाळल्यानंतर पोलीसांना आंदोलकांना ताब्यात घेतले. नरेश निमजे आणि मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात अरुण वनकर, इंद्रभान खिंचे, प्रशांत नखाते आदी सहभागी झाले होते.