प्रॉमिस डे : दिल्या-घेतल्या वचनांची शपथ मोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:22 AM2018-02-11T10:22:11+5:302018-02-11T10:22:26+5:30

आजच्या प्रॉमिस डेला कुणाला वचन द्या अन् ते प्राणपणाने पाळा. तुम्ही दिलेले हे वचन कुणीतरी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, हे विसरू नका.

Promise Day: Do not break the promises | प्रॉमिस डे : दिल्या-घेतल्या वचनांची शपथ मोडू नका

प्रॉमिस डे : दिल्या-घेतल्या वचनांची शपथ मोडू नका

googlenewsNext
ठळक मुद्देवचन द्या आणि प्राणपणाने पाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वचन देणे खूप सोपे आहे; कारण ते देताना केवळ शब्दांचे भांडवलच हवे असते. परंतु खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा ते वचन पाळायची वेळ येते. अशा वळणावर शब्दांचे क्षणिक बुडबुडे टिकत नाहीत. दुभंगू पाहणाऱ्या नात्याला प्रत्यक्ष कृतीच एकसंध ठेवू शकते आणि या कृतीसाठी प्रसंगी सारे मृगजळी मोह नाकारावे लागतात. ते नाकारण्याइतके तुमचे मन मोठे असेल तरच आजच्या प्रॉमिस डेला कुणाला वचन द्या अन् ते प्राणपणाने पाळा. तुम्ही दिलेले हे वचन कुणीतरी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे, हे विसरू नका. दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे... मनातल्या मोरपीसाची शपथ तुला आहे... हे गाणे गुणगुणण्याचा हा दिवस आहे. ‘व्हॅलेंटाईन्स वीक’मधील पाचवा दिवस हा ‘प्रॉमिस डे’म्हणून का साजरा केला जातो माहितेय? कारण, गुलाब, चॉकलेट, टेडी या नश्वर वस्तू आहेत. प्रेमाची भेट म्हणून त्या घरात सजवता येतील; पण मनात सजवायला जीवलगाचे आश्वस्त करणारे वचनच हवे असते. या दिवशी कपल्स एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याचे वचन देतात. एकमेकांसाठी स्वत:मध्ये बदल करण्यास तयार होतात. इतकेच कशाला या दिवशी जोडीदाराला न आवडणाऱ्या सवयीचा अनेक जण त्यागही करतात. त्याग ही गोष्ट कधीही सुखावणारी नसते; परंतु ती आवडत्या व्यक्तीसाठी असेल तर त्यागातही अपार आनंद अनुभवता येऊ शकतो. अर्थात अशा त्यागासाठी जोडीदाराने बळजबरी मात्र करू नये. विचार पटत नसतील तर खुशाल वेगळी वाट धरावी. वचनावरचा विश्वास ढळू देऊ नये; कारण हा विश्वासच नात्यांच्या धमण्यांमध्ये प्राणवायू पेरत असतो. हे पटत असेल तर हा दिवस तुमची प्रतीक्षा करतोय.

द्या वचन आयुष्यभर साथ निभावण्याचे
द्या वचन विश्वासाशी दगा न करण्याचे
द्या वचन भावना अन् सन्मान जपण्याचे
द्या वचन संकटात सुरक्षा पुरविण्याचे
द्या वचन देहावर नव्हे मनावर प्रेम करण्याचे

Web Title: Promise Day: Do not break the promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.