विदर्भातील मराठी बोलीचे संवर्धन व्हावे
By admin | Published: January 15, 2016 03:36 AM2016-01-15T03:36:37+5:302016-01-15T03:36:37+5:30
विदर्भ राज्य होणे ही राजकीय गरज आहे. परंतु यातून मराठी माणसांचे सांस्कृतिक तुकडे होत आहेत व विदर्भवाद हा अमराठीवाद...
श्रीहरी अणे : विदर्भ साहित्य संघाचा ९३ वा वर्धापनदिन साजरा
नागपूर : विदर्भ राज्य होणे ही राजकीय गरज आहे. परंतु यातून मराठी माणसांचे सांस्कृतिक तुकडे होत आहेत व विदर्भवाद हा अमराठीवाद असल्याचा गैरसमज पसरविण्यात येत आहे. मूळात विदर्भवादी हे मराठी माणसाविरुद्ध नाहीत. मराठीला समृद्ध करण्यात विदर्भाचादेखील वाटा आहे. येथील प्रादेशिक साहित्याला दुय्यम दर्जा देता येणार नाही. विदर्भातील मराठी बोलीचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाचा ९३ वा वर्धापनदिन आणि वाड्.मय पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम, कार्याध्यक्ष वामन तेलंग, चंद्रपूर येथे होणाऱ्या विदर्भ साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे सचिव सदानंद फुलझेले, शांतारामजी पोटदुखे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डॉ. सदानंद देशमुख व सदानंद फुलझेले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मराठी भाषेची मक्तेदारी ही केवळ मुंबई किंवा पुण्यापुरती मर्यादित नाही. असे असताना मराठी भाषेची प्रगल्भता ही केवळ एकाच प्रदेशापुरती मर्यादित आहे असा समज का आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुंबई, पुण्याच्या साहित्यिकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. महाराष्ट्राच्या अगोदरपासून विदर्भात मराठीचा वारसा आहे. मराठी भाषेला विदर्भाने अनेक पैलू दिले. विदर्भातील बोलीला मान येथील नागरिकांनीच द्यायला हवा व तिचा अभिमान बाळगायला हवा, असे अॅड.अणे म्हणाले. साहित्य आणि कायदा यांचा तसा पाहिला तर संबंध आहे. मराठी भाषेत काळानुरूप अनेक बदल झाले. या भाषेला आणखी वैभवशाली करण्यासाठी स्थानिक भाषाशास्त्राचा यात समावेश करावाच लागेल, अन्यथा भाषा संकुचित होईल. असे प्रतिपादन अणे यांनी केले. कार्यक्रमात ‘निवडक युगवाणी-भाग २’ या ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रकाश एदलाबादकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शुभदा फडणवीस यांनी संचालन केले तर विलास देशपांडे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
विदर्भातील साहित्याला अवकळा
यावेळी साहित्य संघाच्या वार्षिक वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सदानंद फुलझेले व डॉ.सदानंद देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना वि.सा.संघाच्या कार्याचे कौतुक केले. डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याची जबाबदारी मी पार पाडतो आहे, असे फुलझेले म्हणाले. तर विदर्भातील शेतीप्रमाणेच येथील साहित्याला देखील अवकळा आली आहे, असे धाडसी विधान डॉ. देशमुख यांनी केले.
‘लोकमत’चे राजेश पाणूरकर यांना पुरस्कार
यावेळी साहित्यक्षेत्राशी संबंधित सारस्वतांचा व नवलेखकांचा सत्कार वाङ्मय पुरस्कारांनी सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’चे उपसंपादक राजेश पाणूरकर यांचा हरिकिशन अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याशिवाय ई.झेड.खोब्रागडे, भाऊ गावंडे, डॉ.राजेंद्र डोळके, उर्मिला निनावे, एकनाथ तट्टे, डॉ. मनोहर नरांजे, बळवंत लामकाणे, मालविका देखणे, केशव मुळे, गणेश भाकरे, ओंकार नंदनवार यांचादेखील विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट शाखा पुरस्काराची मानकरी लाखनी शाखा ठरली.