क्रिप्टो करन्सी घोटाळ्याचा प्रमोटर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:49+5:302021-06-28T04:07:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणारा ईथर ट्रेड एशियाचा प्रमोटर राजपाल सिंग ...

Promoter of cryptocurrency scam arrested | क्रिप्टो करन्सी घोटाळ्याचा प्रमोटर जेरबंद

क्रिप्टो करन्सी घोटाळ्याचा प्रमोटर जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणारा ईथर ट्रेड एशियाचा प्रमोटर राजपाल सिंग याच्या अखेर गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने शनिवारी मुसक्या बांधल्या. त्याला न्यायालयात हजर करून त्याची पोलिसांनी ३० जूनपर्यंत कस्टडी मिळवली.

या घोटाळ्याचा सूत्रधार निषेध आणि त्याची पत्नी प्रगती वासनिक यांनी श्रीकांत जिव्हाळ, राजेंद्र खोब्रागडे, गजानन भोलेनाथ मुंगले, राजपाल सिंग आणि संदेश लांजेवार यांच्या मदतीने सक्करदऱ्यात ईथर ट्रेड एशियाचे कार्यालय थाटले होते. प्रत्येक दिवसाला बोनस आणि १०० दिवसात दुप्पट रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून या टोळीने ४ ते ५ हजार गुंतवणूकदारांची २०० कोटींपेक्षा जास्त रक्कम हडपली. प्रारंभी नागपुरातील गुंतवणूकदारांना १०० दिवसात दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आकर्षित केल्यानंतर त्यांनी वर्धा, भंडारा, मुंबईसह ठिकठिकाणी आपले नेटवर्क पसरवले. गुंतवणूकदारांना प्रभावित करण्यासाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनारचे आयोजन केले जायचे. ती सर्व जबाबदारी राजपालसिंग सांभाळत होता. त्यातून ४ ते ५ हजार गुंतवणूकदारांना आकर्षित करून वासनिक दाम्पत्य आणि त्याच्या टोळीने सुमारे २०० कोटी रुपये गोळा केले आणि गाशा गुंडाळून पळून गेले. १०० दिवसांची मुदत संपल्यानंतर आपली रक्कम परत मागण्यास आलेल्या गुंतवणूकदारांना आरोपींचे कार्यालय कुलूपबंद दिसल्याने एकच खळबळ उडाली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणात १७ एप्रिलला गुन्हा दाखल झाला. त्याचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर करीत आहेत.

---

लपत छपत फिरत होता राजपाल

या प्रकरणात पोलिसांनी आतापावेतो खोब्रागडे आणि जिव्हाळला अटक केली तर राजपालच्या रुपातील ही तिसरी अटक आहे. आतापर्यंत राजपाल लपत छपत वेगवेगळ्या भागात राहत होता. शनिवारी राजपाल अमरनगर गोधनी भागात आल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.

फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---

विविध राज्यात अनेकांना गंडा

पोलिसांच्या आजवरच्या तपासात नागपूर- महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गुंतवणूकदारांनाही या टोळीने गंडा घातला आहे. फसगत झालेल्यांचा आकडा ४ ते ५ हजारांच्या घरात आहे. मात्र, आतापर्यंत पोलिसांकडे केवळ १२५ जणांनीच तक्रार दिली आहे. या तक्रारदारांची एकूण रक्कम २ ते २.५ कोटी एवढी आहे. फसगत झालेल्यांनी गुन्हे शाखेत तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

----

Web Title: Promoter of cryptocurrency scam arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.