राज्यातील २३ उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पदोन्नती
By सुमेध वाघमार | Published: June 6, 2024 09:17 PM2024-06-06T21:17:50+5:302024-06-06T21:18:00+5:30
-११ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : तर ३८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांनाही बढती
नागपूर : लोकसभा निवडणूकीचे निकाल लागून दोन दिवस होत नाही तोच गुरुवारी राज्यभरातील आरटीओमधील तब्बल २३ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ११ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी व ३८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश धडकले. शिवाय, तीन प्रादेशिक परिवहन अधिकाºयांचा बदल्याही करण्यात आल्या.
परविहन विभागातील तब्बल ३५ महत्त्वाच्या पदांचा कार्यभार अतिरीक्त म्हणून वर्षाेनवर्षे सांभाळला जात होता. धक्कादायक म्हणजे, १७ आरटीओ कार्यालयाला प्रादेशिक परिवहन अधिकारी नव्हते. दरम्यानच्या काळात शासनाने ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) दर्जा दिला. मात्र, त्याचेही कामकाज अतिरीक्त म्हणून सांभाळले जात होते. एकूणच आरटीओचे कामकाज प्रभावित झाले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला.
-भूयार यांची अकोला तर चव्हाण यांची कोल्हापूर आरटीओ पदोन्नती
पूर्व नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देत त्याची पदस्थापना अकोला आरटीओ येथे करण्यात आली. तर मागील अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण अखेर यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांची पदस्थापना कोल्हापूर आरटीओ येथे करण्यात आली.
-शहर आरटीओला बिडकर तर ग्रामीणला काठोळे
नंदुरबार आरटीओ येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेले किरण बिडकर यांना पदोन्नती देत त्यांच्याकडे नागपूर शहराची तर, जालना आरटीओ येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेले विजय काठोळे यांनाही पदोन्नती देत त्यांच्याकडे नागपूर ग्रामीण देण्यात आले. चंद्रपूर आरटीओ येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. परंतु नावाची घोषणा झाली नसल्याची माहिती आहे.
-गीते यांच्यासह तिघांच्या बदल्या
अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते हे मागील सहा वर्षांपासून या कार्यालयाचा कारभार पाहत होते. मागील एक वर्षांपासून त्यांच्याकडे नागपूर शहर व नागपूर ग्रामीण आरटीओचा अतिरीक्त कार्यभार होता. आता त्यांच्या बदली झाली. त्यांच्या जागेवर नांदेड आरटीओचे शैलेश कामत आले आहेत. या शिवाय, रवी गायकवाड यांची ठाणे कार्यालयात बदली झाली.
-उपप्रादेशिक व निरीक्षकांच्या तात्पुरत्या पदोन्नती
परिवहन आयुक्तांनी सेवाज्येष्ठतानुसार ११ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली खरी परंतु ती तात्पुरती असल्याचेही स्पष्ट केले. यात नागपूर ग्रामीण आरटीआतील स्नेहा मेढे यांना पदोन्नाती देत त्याची पदस्थापना वर्धा आरटीओत करण्यात आली. तर, ३८ सहायक मोटार वाहन निरीक्षकांनाही तात्पुरत्या स्वरुपात मोटार वाहन निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली.