स्टॉल्स, वस्तू विक्री केंद्राला चालना; मध्य रेल्वेने १२२.३५ कोटींचा गल्ला
By नरेश डोंगरे | Published: April 12, 2024 07:09 PM2024-04-12T19:09:35+5:302024-04-12T19:09:53+5:30
कमाईचे नवनवे स्रोत : उत्पन्नाची कोटीच्या कोटी उड्डाणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगवेगळ्या विभागातून उत्पन्नाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या मध्य रेल्वेने आता कोणतीही सेवा न देता (नॉन फेअर रेव्हेन्यू) १२२ .३५ कोटींचा महसूल मिळवला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती स्पष्ट करण्यात आली आहे.
प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, खान-पान सेवा (कॅटरिंग), पार्सल सेवा, तिकीट तपासणी, स्क्रॅप विक्री आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या विभागातून मध्य रेल्वेने संपलेल्या आर्थिक वर्षात शेकडो कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. एकीकडे कोट्यवधींची ही कमाई करतानाच रेल्वे प्रशासनाने उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत निर्माण करण्याचे गेल्या काही महिन्यांत प्रयत्न चालविले आहेत. त्यानुसार, जाहिरातीसाठी स्पेस उपलब्ध करून देणे, विविध स्टॉल्स, काउंटर, वस्तू विक्री केंद्र, जनऔषधी केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहन देऊन मध्य रेल्वेने १२२.३५ कोटींचा महसूल मिळवला आहे. प्रवासी भाडे आणि माल वाहतुकी व्यतिरिक्त मिळवलेला मध्य रेल्वेचा हा महसूल भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सर्वाधिक आहे.
खर्चातही साडेसहा कोटींची कपात
एकीकडे उत्पन्नाचे नवनवे स्रोत निर्माण करतानाच मध्य रेल्वेने आपल्या खर्चातही साडेसहा कोटींची कपात केली आहे. खानपान सेवा, गाड्यांचा रखरखाव, अंतर्गत देखभाल आदींचे कंत्राट देण्यात येत असल्याने मनुष्यबळाची, अर्थात कर्मचाऱ्यांच्या पगाराची मोठी रक्कम वाचत आहे. साैर ऊर्जेचा पर्याय निवडून ठिकठिकाणी पॅनल निर्माण करण्यात आल्याने विजेवर होणारा भरमसाठ खर्चही मध्य रेल्वेने वाचविला आहे. संपलेल्या आर्थिक वर्षांत भांडवली, तसेच मनुष्यबळ बचतीवर मुंबई विभागाचे ४ कोटी, भुसावळ विभाग ८०.२१ लाख, नागपूर विभाग ५४ लाख, सोलापूर विभाग ६२.५५ लाख आणि पुणे विभागाचे ५२.८८ लाख, असे साडेसहा कोटी रुपये वाचवले आहे.