सेवा ज्येष्ठता यादीच्या आधारेच पदोन्नतीची प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:06 AM2021-06-29T04:06:48+5:302021-06-29T04:06:48+5:30
नागपूर : सेवा ज्येष्ठता यादीवरील प्राप्त सर्व आक्षेपांची पुराव्या दाखल नोंद घेऊन अंतिम सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्यात आली ...
नागपूर : सेवा ज्येष्ठता यादीवरील प्राप्त सर्व आक्षेपांची पुराव्या दाखल नोंद घेऊन अंतिम सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्यात आली असून, त्याच आधारे पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी प्रा. चिंतामण वंजारी यांनी स्पष्ट केले. सेवा ज्येष्ठता यादी नसेल तर पदोन्नतीची प्रक्रिया राबविताच येत नाही, असेही ते म्हणाले.
शिक्षण विभाग प्राथमिक मध्ये सनियंत्रित सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख संवर्गाची १ जानेवारी २०२० रोजीची तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी सर्व कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेवा ज्येष्ठता यादी सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. ज्या शिक्षकांचा यादीवर आक्षेप होता, त्यांचे आक्षेप पुराव्यादाखल दस्तावेजासह गटशिक्षणाधिकारी यांना सादर करायचे होते. गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून आक्षेप प्राप्त झाल्यानंतर तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करण्यात आली. त्या आधारे विस्तार अधिकारी शिक्षण तसेच केंद्र प्रमुख संवर्गातील पदोन्नतीने पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. ज्या शिक्षकांची सेवा कोरोनाच्या कामासाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहे. त्या शिक्षकांकडून पुराव्यादाखल आक्षेप नोंदविण्यास विलंब लागत असल्याने १६ जून २०२१ पर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. सेवाज्येष्ठता यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी शिक्षकांना पुरेशी संधी देण्यात आलेली आहे. नियमानुसारच पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे वंजारी म्हणाले.