महिलांच्या चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन आवश्यक : महापौर नंदा जिचकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 08:26 PM2018-01-18T20:26:44+5:302018-01-18T20:28:13+5:30
भारतीय घटनेतील ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून संधी निर्माण होत असतानाच समाजाने त्यांना प्रोत्साहन दिले तर महिला अधिक समक्षपणे काम करू शकतात, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय घटनेतील ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून संधी निर्माण होत असतानाच समाजाने त्यांना प्रोत्साहन दिले तर महिला अधिक समक्षपणे काम करू शकतात, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीच्या रजत जयंतीनिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘प्रगती आणि वाटचाल’ या विषयावर विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेचे उद्घाटन करतांना महापौर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रा.अनिल सोले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनूप कुमार, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी घटनेच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारामुळेच सामान्य जनतेपर्यत विकासाची प्रक्रिया पोहोचत असल्याचे सांगितले. पुस्तक व गुलाबपुष्प भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रस्तावना उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी केली.
विद्यापीठांनी अभ्यास करून सूचना सादर कराव्या - अनूप कुमार
बदलत्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती व रचना कशी असावी यासंदर्भात विद्यापीठांनी अभ्यास करून आपल्या सूचना सादर कराव्यात, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकसभेच्या धर्तीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका - शेखर चन्ने
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर घेण्यात येत आहेत. आता लोकसभेच्या धर्तीवरच ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा घेण्याचा प्रयत्न आयोगाचा आहे. निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी देशात प्रथमच उमेदवारी अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरण्याचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असल्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात प्रशिक्षणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींनी समाजाच्या तळागाळात जाऊन काम करावे - इ.झेड.खोब्रागडे
गावाचा संपूर्ण विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करावे. यामुळे जनतेच्या मनात आदर निर्माण होईल, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी इ. झेड.खोब्रागडे यांनी केले.‘स्थानिक स्वराज्य संस्थाची वास्तविकता’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मोहन हिरालाल हिराभाई, प्रा. शेषकुमार येर्लेकर, सरपंच चंदू पाटील मारकवार, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती होती.