विदर्भाची शान नागपूर फ्लाईंग क्लबला तातडीने लायसन्स द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:11 AM2021-09-16T04:11:49+5:302021-09-16T04:11:49+5:30
नागपूर : विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबला फ्लाईंग ट्रेनिंग लायसन्स मिळण्यासाठी सदर अर्जावर नागरी उड्डयन महासंचालकांनी तातडीने निर्णय ...
नागपूर : विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबला फ्लाईंग ट्रेनिंग लायसन्स मिळण्यासाठी सदर अर्जावर नागरी उड्डयन महासंचालकांनी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सुमेधा घटाटे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केली. त्यानंतर न्यायालयाने हा मुद्दा रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर चार आठवड्यानंतर पुढील सुनावणी निश्चित केली.
नागपूर फ्लाईंग क्लब तातडीने कार्यान्वित व्हावे, याकरिता सुमेधा घटाटे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. डायरेक्टरेट जनरल ऑफ फ्लाईंग कॅडेट कोअरने निवडक विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाईंग क्लब येथे २० तास उड्डाणाच्या एअर विंग 'सी' प्रमाणपत्राकरिता प्रशिक्षण देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी कमर्शियल पायलट व फायटर पायलटचे लायसन्स मिळण्यासाठी पात्र होतील, तसेच त्यांना वायुसेनेमध्ये नोकरी मिळविता येईल. त्यामुळे नागरी उड्डयन महासंचालकांनी नागपूर फ्लाईंग क्लबला तातडीने फ्लाईंग ट्रेनिंग लायसन्स देणे आवश्यक आहे, असे न्यायालयाला सांगण्यात आले. याचिकाकर्तीतर्फे ॲड. श्रीनिवास देशपांडे यांनी बाजू मांडली.
------------
'डीसीएफआय'ची निवड
राज्य सरकारने नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये डेप्युटी चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टर (डीसीएफआय)ची निवड केली आहे. यासंदर्भातील अन्य प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सरकारने उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.