योग्य काळजी घेतल्यास आजार राहील दूर; सॅनिटायझर अत्यावश्यक नाहीच, साबण पुरेसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:04 PM2020-03-18T13:04:12+5:302020-03-18T13:04:31+5:30
आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुणे आवश्यक आहेत. त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या कोरोनाच्या संशयित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या, तर या कोरोनाला दूर ठेवणे शक्य आहे. हा साथीचा आजार आहे. हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुणे आवश्यक आहेत. त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही.
हात स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक सॅनिटायझर विकत घेण्यावर भर देत आहेत. कारण त्यामुळे हात स्वच्छ ठेवले जातात. परंतु, केवळ साबणाने हात स्वच्छ आणि योग्य प्रकारे धुतले तर कोरोनापासून दूर राहता येते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे विनाकारण महागडे सॅनिटायझर घेण्याची गरज नाही. हात स्वच्छ ठेवणे
आवश्यक आहे. कारण कोरोनाबाधितद्वारे
कोरोना विषाणू कुठेही लागू शकतो. आपण
हात कुठेही ठेवतो आणि हाताला तो विषाणू लागून आपल्याला त्याची बाधा होऊ शकते. म्हणून हातांची योग्य स्वच्छता करावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
वारंवार हात धुणे का आवश्यक आहे?
सूक्ष्मीजीवशास्त्रानुसार ४० टक्के इन्फेक्शन हे हाताद्वारे होतात. ‘कोविड-१९’ या विषाणूचा प्रसार, बाधित रुग्णांच्या शिंकेतून अथवा खोकल्यातून तर होतोच पण या शिवाय रुग्णांच्या शिंकेतून वा खोकल्यातून बाहेर पडलेले विषाणू हाताळणाऱ्या वस्तूंवर पडून तिथे साधारणपणे ९ दिवस जिवंत राहू शकतात. या वस्तू इतरांनी हाताळून च्या नाकाला वा चेहºयाला हात लावला तर त्यांनाही या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून वारंवार हात धुण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे.
-डॉ. राजेंद्र सुरपाम विभाग प्रमुख,
सूक्ष्मजीवशास्त्र, मेडिकल
कोरोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही. पण आवश्यक काळजी घेणे जरूरीचे आहे. जेवणाआधी, बाहेरून जाऊन आल्यावर वस्तूंना हाताळल्यानंतर, खेळणी खेळल्यानंतर मुलांनी साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. शाळेतही डबा खाण्यापूर्वी कंटाळा न करता हात धुणे आवश्यक आहे. सर्दी, शिंका, खोकला यामध्ये तोंडावर रुमाल ठेवून क्रिया करण्याची सवय मुलांना लावणे आवश्यक आहे. तो रुमाल वेगळा ठेवावा. दुसºया दिवशी धुवून टाकावा. कोणतीही वस्तू लहान मुले तोंडात घालू पाहातात. याकडे लक्ष ठेवावे. मुलांचे कपडे, डबा या गोष्टी स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी. थुंकणे, खूप जवळ जाऊन बोलणे, शिंकणे या गोष्टी टाळल्या जातील हे पालकांनी पाहावे. बाहेर जाताना महागड्या मास्कऐवजी साधा रुमाल बांधला तरी चालतो.
- डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल