थकबाकीदारांच्या मालमत्ता मनपाच्या नावावर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:25+5:302021-07-26T04:07:25+5:30
विक्री लिलावाला प्रतिसाद न मिळाल्यास कार्यवाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वारंवार सूचना देऊनही थकीत कर न भरणाऱ्या ...
विक्री लिलावाला प्रतिसाद न मिळाल्यास कार्यवाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वारंवार सूचना देऊनही थकीत कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या शहरातील जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री केली जाते. परंतु काही मालमत्तांना लिलावात प्रतिसाद मिळत नाही. अशा मालमत्ता महापालिकेच्या नावावर करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मालमत्ताकराच्या वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारची कारवाई केली. थकबाकीदारांना वॉरंट बजावले, जप्तीची कारवाई करून लिलाव करण्यात आला. मात्र, यानंतरही काही थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अशा मालमत्ता आता महापालिकेच्या नावावर करण्यात येणार आहेत.
मनपाची ९०० कोटींची थकबाकी आहे. यात प्रामुख्याने मोठ्या थकबाकीदारांचा समावेश आहे. १९९ मालमत्ताधारकांकडे ५ लाखाहून अधिक थकबाकी आहे.
कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरा
शहराच्या विविध भागातील थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाणार आहे. मात्र, खरेदीदार उपलब्ध न झाल्यास स्थावर मालमत्ता महापालिकेच्या नावावर करण्यात येतील. कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर थकीत असणाऱ्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
...................