मालमत्ता करवाढीचा दणका
By admin | Published: March 8, 2016 02:57 AM2016-03-08T02:57:46+5:302016-03-08T02:57:46+5:30
महापालिकेने १ एप्रिल २०१५ पासून नवीन पद्धतीने मालमत्ता कर आकारणीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रेडिरेकनरच्या आधारे
गणेश हूड ल्ल नागपूर
महापालिकेने १ एप्रिल २०१५ पासून नवीन पद्धतीने मालमत्ता कर आकारणीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रेडिरेकनरच्या आधारे कर आकारणी करण्यात आली आहे. वाढीव दरानुसार करात मोठी वाढ झाली आहे. सोबतच पथकर, शिक्षण उपकर, पाणी करलाभ व मलजल लाभ करांचा यात समावेश करून प्रशासनाने शहरातील नागरिकांना मालमत्ता करवाढीचा चांगलाच दणका दिला आहे. यामुळे नागरिकात प्रचंड नाराजी आहे.
नवीन पद्धतीत मालमत्ता करात ५० ते ६० टक्के वाढ झालेली आहे. धंतोली, रामदासपेठ, शंकरनगर, सदर, महाल, लक्ष्मीनगर, वर्धमाननगर, वर्धा रोड अशा भागात वडिलोपार्जित घर असलेल्या गरीब कुटुंबांना कर भरणे कठीण झाले आहे. करवाढीमुळे भविष्यात शहरातील चांगल्या भागात वास्तव्य करणे या लोकांना कठीण होणार आहे.
प्रशासनाकडून मालमत्ता करात फारशी वाढ झाली नसल्याचा दावा केला जात आहे. परंतु वास्तव वेगळेच आहे. स्लम व लहान घरात राहणाऱ्यांना २०१४-१५ या वर्षात १३८ रुपये सामान्य कर होता. नवीन पद्धतीत तो २०१ रुपये झाला आहे. तसेच ११८ रुपये मलजल कराऐवजी १७२ रुपये आकारण्यात आले आहे. शिक्षण करातही वाढ करण्यात आली आहे. सोबतच किरकोळ कराची आकारणी करण्यात आली आहे.
सामान्यांना फटका
जुन्या पद्धतीनुसार स्लम भागातील वा लहान घरातील नागरिकांना २०० ते ३०० रुपयांच्या आसपास कर भरावा लागत होता. परंतु नवीन पद्धतीत सरसकट कर आकारणी ५०० रुपयांच्या पुढे आहे. ही करवाढ दुपटीच्या आसपास आहे. याचा फटका प्रामुख्याने गरीब लोकांना बसला आहे. शहरात अशा नागरिकांची संख्या दोन लाखाहून अधिक आहे.