नागपुरात प्रॉपर्टी डिलरला खंडणीची मागणी : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 08:55 PM2019-03-18T20:55:39+5:302019-03-18T20:57:04+5:30
प्रॉपर्टी डिलरने एक लाखाची खंडणी देण्यास नकार दिला म्हणून तीन आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्री ८.३० वाजता टिमकी परिसरात हा गुन्हा घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रॉपर्टी डिलरने एक लाखाची खंडणी देण्यास नकार दिला म्हणून तीन आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. रविवारी रात्री ८.३० वाजता टिमकी परिसरात हा गुन्हा घडला.
धनराज शंकरराव सोनकुसरे (वय ५०) हे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिमकी दादरा पुलाजवळ राहतात. ते प्रॉपर्टी डिलर आहेत. रविवारी रात्री ८.३० वाजता सोनकुसरे त्यांच्या घरी असताना आरोपी ललित अजय भामोडे (वय २१, रा. राजविलास टॉकीजजवळ, महाल), शेख रियाज अब्दुल रशिद (वय ५६, रा. महाल) आणि त्यांचा एक साथीदार सोनकुसरेंच्या घरी आले. ओळखी असल्यामुळे सोनकुसरेंनी त्यांना आत घेतले. एवढ्या रात्री घरी येण्याचे कारण सोनकुसरेंनी आरोपींना विचारले असता, आम्हाला बाहेर फिरायला जायचे आहे, एक लाख रुपये पाहिजे, असे ते म्हणाले. सोनकुसरे यांनी नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी सोनकुसरेंना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी शिवीगाळ करून पळून गेल्यानंतर सोनकुसरे यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक बी.डी. कुलथे यांनी कलम ३८७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
आरोपी गुन्हेगारी वृतीचे
आरोपी भामोडे हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल आहेत. रियाज फळ विक्रेता असून, त्याच्याच दुकानावर भामोडे बसून राहतो. तर, तिसरा आरोपी कोण आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संबंधाने आरोपींचा शोध सुरू असल्याचे तहसील पोलिसांनी सांगितले.