प्रॉपर्टी डीलरची हत्या
By Admin | Published: December 16, 2014 01:03 AM2014-12-16T01:03:23+5:302014-12-16T01:03:23+5:30
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज भररस्त्यावर एका प्रॉपर्टी डीलरची भीषण हत्या झाली. शीतल श्यामराव राऊत असे मृताचे नाव आहे. ते दुबेनगरात राहात होते. शीतल आज सायंकाळी ६.४५ च्या
हुडकेश्वरध्ये थरार : ४८ तासात दुसरी घटना
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज भररस्त्यावर एका प्रॉपर्टी डीलरची भीषण हत्या झाली. शीतल श्यामराव राऊत असे मृताचे नाव आहे. ते दुबेनगरात राहात होते. शीतल आज सायंकाळी ६.४५ च्या सुमारास राजापेठ चौकाजवळच्या भावाच्या दुकानात आले होते. दोन जणांसोबत बोलत बोलत शीतल समोरच्या पानटपरीवर जाण्यासाठी निघताच चार ते पाच सशस्त्र गुंडांनी शीतलवर हल्ला चढवला. त्यांना धारदार शस्त्राने भोसकून ठार मारले. शीतलचे नातेवाईक बाजूलाच होते. घटनास्थळी मोठी गर्दी होती. त्यांनी आरडाओरडही केली. मात्र, त्याला न जुमानता हल्लेखोरांनी शीतलला ठार मारले. शीतलला रस्त्याच्या मध्ये रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. अनेकांनी आपापली दुकाने बंद करून पळ काढला. माहिती कळाल्यानंतर हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शीतलचा मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला. ही हत्या कुणी आणि कशासाठी केली, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, टोल वसुलीत गुंतलेल्या एका गुन्हेगाराचा या हत्येशी संबंध असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
आनंदावर विरजण
राऊत कुटुंबामध्ये चार दिवसानंतर विवाह असल्याचे घटनास्थळी काही जण सांगत होते. या विवाह समारंभाच्या नियोजनातच शीतल गुंतले होते. लग्नाची धामधूम आणि आनंदाचे वातावरण असताना शीतलची निर्घृण हत्या झाल्यामुळे राऊत कुटुंबीयांवर तीव्र शोककळा पसरली आहे.