प्रॉपर्टी डीलरचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: January 28, 2017 01:45 AM2017-01-28T01:45:08+5:302017-01-28T01:45:08+5:30
दुसऱ्याच्या मालकीचे भूखंड विकून २५ लाख ३१ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका प्रॉपर्टी डीलरचा
दुसऱ्याचा भूखंड विकला : २५ लाखांनी फसवणूक केल्याचे प्रकरण
नागपूर : दुसऱ्याच्या मालकीचे भूखंड विकून २५ लाख ३१ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एका प्रॉपर्टी डीलरचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
अनिल श्यामराव शिंगणे (५०) असे आरोपीचे नाव असून, तो काटोल रोड नर्मदा कॉलनी येथील रहिवासी आहे. प्रकरण असे, आरोपीने बोरगाव येथील अनुक्रमे १८०० आणि ३६०० चौरस फुटाचे दोन भूखंड २४ आॅक्टोबर २०११ रोजी ८१ लाख रुपयात विकण्याचा सौदा मंजुला प्रवीण गुप्ता यांच्यासोबत मेसर्स ओएसिस बिल्डर अॅन्ड डेव्हलपर्सच्या माध्यमातून केला होता. शिंगणे याला बयानापत्रानुसार २ लाख ३१ हजार रुपये रोख देण्यात आले होते. १५० दिवसात करारनामा करण्याचे ठरले होते.
मेसर्स ओएसिसचे भागीदार खुद्द मंजुला गुप्ता, रवी कांबळे रा. जुना सुभेदार आणि शुद्धोदन वाहणे रा. पॉप्युलर सोसायटी हे आहेत. १४ डिसेंबर २०११ रोजी करारनामा करून शिंगणे याला १० लाखांचा धनादेश देण्यात आला होता. १२ महिन्यात या भूखंडांचे खरेदीखत रजिस्टर्ड करण्याचे ठरले होते.
मार्च २०१२ मध्ये मंजुला गुप्ता यांना असे समजले होते की, या मालमत्तेचे मूळ मालक द्वारकाप्रसाद पांडे हे असून, त्यांनी शिंगणेविरुद्ध न्यायालयात दिवाणी दावा केलेला आहे. तसेच त्यांच्या तक्रारीवरून २७ सप्टेंबर २०११ रोजी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हाही दाखल आहे.
मंजुला गुप्ता यांना आॅक्टोबर २०१३ मध्ये असेही समजले होते की, शिंगणे याने या भूखंडांचा सौदा ड्रीमवे बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे भागीदार शुद्धोदन वाहणे आणि चंद्रशेखर मुदलियार यांच्यासोबत ८६ लाख ४० हजार रुपयात करून १३ लाख रुपये घेतले होते.
करारनामा नोटराईज केला होता. मंजुला गुप्ता यांच्या तक्रारीवरून अनिल शिंगणे आणि इतरांविरुद्ध २६ मार्च २०१६ रोजी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, न्यायालयाने तो फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)