मालमत्ता कर आढावा कार्यक्र म बदलला
By admin | Published: July 12, 2017 02:51 AM2017-07-12T02:51:05+5:302017-07-12T02:51:05+5:30
मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी कर आकारणी व कर संकलन समिती आणि स्थायी समितीने
कर विभागाची बैठक रद्द : अध्यक्ष व आयुक्तांचा झोननिहाय आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मालमत्ता व पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी कर आकारणी व कर संकलन समिती आणि स्थायी समितीने झोननिहाय आढावा घेण्याचा वेगवेगळा कार्यक्रम निश्चित केला होता. यामुळे गोंधळ निर्माण झाल्याने कर आकारणी विभागाची मंगळवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली तसेच झोननिहाय आढावा कार्यक्र मात बदल करण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव व आयुक्त अश्विन मुदगल बुधवारपासून आढावा बैठका घेणार आहेत.
संदीप जाधव यांनी कर आकारणी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून विभागाची बैठक रद्द करण्याची सूचना केली तसेच १२ जुलैपासून आढावा कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याची माहिती दिली. पाणी व मालमत्ता कर थकीत असलेल्या ग्राहकांसाठी नागपूर महापलिकेतर्फे १७ जुलै ते ८ आॅगस्ट या कालावधीत अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आयुक्त झोननिहाय आढावा घेणार आहेत.
मालमत्ता कर व जलप्रदाय विभागाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व नियोजनाचा आढावा या दौऱ्यात घेतला जाणार आहे. १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता हनुमाननगर आणि ४.३० वाजता धंतोली झोन, १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता गांधी-महाल झोन, ४.३० वाजता सतरंजीपुरा झोन, १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता लक्ष्मीनगर झोन, ४.३० वाजता धरमपेठ झोन, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता नेहरूनगर झोन, ४.३० वाजता लकडगंज झोन तर १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आसीनगर झोन आणि ४.३० वाजता मंगळवारी झोनचा स्थायी समिती अध्यक्ष व आयुक्त आढावा घेणार आहेत.
झोन स्तरावर आढावा बैठक आयोजित करण्याबाबत कर आकारणी विभागाशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार १२ जुलैला बैठक ठरली होती. परंतु कर विभागाच्या पत्रकात ११ जुलैला बैठक आयोजित करण्यात आली होती. समन्वय न झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती संदीप जाधव यांनी दिली.