आता विक्रीपत्रावरून मालमत्ता हस्तांतरण
By Admin | Published: September 16, 2016 03:25 AM2016-09-16T03:25:35+5:302016-09-16T03:25:35+5:30
नगर भूमापन कार्यालयात मालमत्ता फेरफार नोंदीसाठी अर्जदारास अर्जासोबत घोषणापत्राची प्रत जोडावीच
भूमी अभिलेख विभागाचा निर्णय : नागरिकांना मोठा दिलासा मिळणार
नागपूर : नगर भूमापन कार्यालयात मालमत्ता फेरफार नोंदीसाठी अर्जदारास अर्जासोबत घोषणापत्राची प्रत जोडावीच लागते. वास्तविक अपार्टमेंट विकसित करताना सुरुवातीच्या कालावधीत संबंधित मालमत्ताधारक अथवा विकासकाव्दारे घोषणापत्राच्या दस्तांची नोंदणी केली जाते. त्यामुळे ही प्रत त्यांच्याकडे उपलब्ध असते. बऱ्याचदा अपार्टमेंट अथवा मालमत्ताची एकापेक्षा जास्त हस्तांतरण होतात. त्यामुळे फेरफारसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराजवळ घोषणापत्राची प्रत नसते. ती सहजपणे उपलब्ध होत नसल्याने अर्जदाराला त्रास होतो. ही बाब विचारात घेता जिल्हा भूमी अभिलेख विभागाने विक्रीपत्रावरून मालमत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा त्रास वाचणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नगर भूमापन अधिकारी क्र.१ ते ३ नागपूर यांच्यामार्फत अपार्टमेंटच्या हस्तांतरणानुसार फेरफाराच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर घेण्यात येतात. एखाद्या मिळकतीवर विकसित केलेल्या इमारतीमधील अपार्टमेंटच्या हस्तांतरणानुसार फेरफार नोंदी मिळकत पत्रिकेवर घेताना त्या अपार्टमेंटचे हस्तांतरण दस्तामधील वर्णन हे त्या मिळकतीबाबत विकसनाच्या सुुरुवातीस करून ठेवलेल्या घोषणापत्राच्या दस्तातील वर्णनाशी जुळते का याची पडताळणी केली जाते. ते जुळत असल्यास हस्तांतरणाच्या दस्तानुसार फेरफाराच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर केल्या जातात.
अशा प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी घोषणापत्राच्या दस्तांची आवश्यकता असते. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी घोषणापत्राची प्रत सादर करण्यास सांगतात. परंतु ती सादर न केल्यास मालमत्ताचे हस्तांतरण होत नाही. यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांनी दिली.
यानिर्णयामुळे यापुढे एखाद्या मिळकतीवर नव्याने निर्माण होत असलेल्या इमारतीच्या घोषणापत्राची नोंद घेण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास नियमानुसार घोषणापत्राची पडताळणी करून घोषणापत्रानुसार सविस्तर फेरफार नोंद घेतली जाणार आहे. नियमानुसार कार्यवाही केल्यानंतर घोषणापत्र फेरफार मंजूर झाल्यास त्याची मिळकतीवर सविस्तर नोंद घेण्यात येणार आहे.
एखाद्या जमिनीवर नव्याने निर्माण केलेल्या इमारतीमधील अपार्टमेंटच्या हस्तांतरणानुसार फेरफार नोंदी घेण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास, तसेच एखाद्या जमिनीवर यापूवीं घोषणापत्राच्या नोंदीशिवाय अपार्टमेंटच्या फेरफार नोंदी झाल्या आहेत.
त्यानंतर उर्वरित अपार्टमेंटच्या हस्तांतरणानुसार फेरफार नोंदी घेण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास घोषणापत्राची आवश्यक पडताळणी करून एकाचवेळी त्या इमारतीमधील घोषणापत्राच्या दस्तानुसार स्वतंत्र फेरफार नोंद व अपार्टमेंट डीडनुसार हस्तांतरणाची फेरफार नोंद स्वतंत्रपणे केली जाणार आहे. अपार्टमेंट डीडनुसार घेतलेली हस्तांतरणाची फेरफार नोंद मिळकत पत्रिकेवर घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
...तर अधिकाऱ्यांवर कारवाई
अपार्टमेंट डीडनुसार हस्तांतरणाची फेरफार नोंद घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारास यापुढे अर्जासोबत घोषणापत्राची प्रत मागितली जाणार नाही. मिळकत पत्रिकेवरील नोंदीवरून फेरफार करण्यात येईल. अपार्टमेंटच्या नोंदी घेताना घोषणापत्राच्या नोंदी घेण्यात येतील. तसेच मिळकत पत्रिकेवर नोंद असूनही अर्जदाराला घोषणापत्राची प्रत मागितल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.