नागपुरातील कुख्यात ठगबाज प्रवीण निनावेची ५६ लाखाची संपत्ती जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:18 AM2018-04-24T00:18:31+5:302018-04-24T00:18:45+5:30
स्वस्तात साखर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या कुख्यात ठगबाज प्रवीण निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालया(ईडी)ने जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वस्तात साखर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावणाऱ्या कुख्यात ठगबाज प्रवीण निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची संपत्ती प्रवर्तन निदेशालया(ईडी)ने जप्त केली. निनावे याच्याविरुद्ध इतर राज्यांतही अनेक प्रकरण दाखल आहेत. तो नॅशनल कमोडिटी सप्लाय कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एनसीएसईआय) नावाने कंपनी चालवत होता. कंपनी केंद्र सरकारद्वारे प्रमाणित असल्याचे सांगत होता. बाजारमूल्यापेक्षा कमी किमतीत साखर उपलब्ध करून देतो, असे व्यापाऱ्यांना सांगायचा. सुरुवातीला कमी किमतीत साखर उपलब्ध करून देत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांचा निनावेवर विश्वास बसायचा. त्यानंतर मोठा आॅर्डर घेऊन बहुतांश राशी अग्रीम घ्यायचा. परंतु पुरवठा करायचा नाही. या युक्तीने त्याने अनेक व्यापाऱ्यांना ठगविले. त्याने व्यापाऱ्यांना करोडो रुपयांनी ठगविले.
निनावेची ठगबाजी समोर आल्यानंतर ‘ईडी’ ने प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) २००० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. निनावे बराच काळ राजस्थान पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला जोधपूर कारागृहात ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान प्रवर्तन निदेशालयाला निनावे याची ५६ लाख २२ हजार रुपयांची चल-अचल संपत्तीची माहिती मिळाली. ही संपत्ती त्याने ठगबाजी करून जमविली होती. ‘ईडी’ ने ही संपत्ती जप्त केली. यात एचडीएफसी बँकेच्या धंतोली शाखेच्या खात्यात २,१५,०१६ रुपये, मुंबई शाखेच्या खात्यातून २८,९३,३६२ रुपये, १६,७२,७३६ रुपये किमतीचे महिंद्रा वाहन तसेच ८४,०९७८ रुपये किमतीचे बोलेरो वाहनाचा समावेश आहे.
निनावे याच्या ठगबाजीचा कारभार वाढण्यासाठी शहर पोलिसांचे मोठे योगदान राहिले आहे. निनावे हा धंतोलीतील कार्यालयातून कामकाज चालवीत होता. त्याने बरीच वर्षे धंतोली पोलिसांना मॅनेज करून ठगबाजीचा कारभार केला. त्याच्यामुळे धंतोली पोलीस मालामाल झाले होते. निनावे याच्याविरुद्ध अनेक राज्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्या राज्यातील पोलीस त्याला पकडण्यासाठी धंतोली ठाण्यात पोहचल्यानंतर निनावेला तत्काळ माहिती मिळत होती. त्यामुळे तो फरार होत होता. बऱ्याचदा बाहेरच्या राज्याचे पोलीस धंतोली ठाण्यात न पोहचता निनावे याच्या कार्यालयात पोहचत होते. निनावे याने कार्यालयात लपण्याची जागा बनविली होती. धंतोली पोलीस अथवा आर्थिक गुन्हे शाखेने कधीही निनावेवर प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही.
लोकमतने केला होता खुलासा
लोकमतने सहा महिन्यांपूर्वी निनावे याने नव्याने व्यवसाय सुरू केल्याचा खुलासा केला होता. त्याने वर्धा रोडवर कार्यालयही घेतले होते. येथे कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. लोकमतच्या खुलाशानंतर ‘ईडी’च्या कारवाईत वेग आला.
आता आरोपपत्राची तयारी
सूत्रांच्या मते ‘ईडी’ आता निनावे याच्या विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याच्या तयारीत आहे. ‘ईडी’ निनावेच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करीत आहे. सध्या आर्थिक फसवणुकीची प्रकरण वाढले आहे. त्यामुळे ‘ईडी’ने निनावेच्या प्रकरणाला अतिशय गांभिर्याने घेतले आहे.