२५.२० लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:40+5:302021-05-05T04:14:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : पाेलिसांनी तारणा फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारा टिप्पर पकडला. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : पाेलिसांनी तारणा फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारा टिप्पर पकडला. यात टिप्परचालकास अटक करून मालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविला. शिवाय, त्याच्याकडून एकूण २५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. ३) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
गडचिराेली-नागपूर महामार्गावरून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच उमरेड पाेलिसांच्या पथकाने या मार्गावरील तारणा फाटा परिसरातून जाणाऱ्या मालवाहू वाहनांवर नजर ठेवली हाेती. त्यातच पाेलिसांच्या पथकाने नागपूरच्या दिशेने जाणारा एमएच-४०/बीएल-२४८४ क्रमांकाचा टिप्पर थांबवून झडती घेतली असता, त्या टिप्परमध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात टिप्परमधील रेती ही विनाराॅयल्टी असून, त्यात क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेली जात असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ही रेतीची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी टिप्परचालक सचिन घन:श्याम डुंबे (३५, रा. सावंगी) यास ताब्यात घेत अटक केली.
या टिप्परचा मालक प्रशांतजित उरकुडादास दहिवले असल्याची माहिती सचिनने देताच पाेलिसांनी त्याच्याविरुद्धही गुन्हा नाेंदविला. या कारवाईमध्ये २५ लाख रुपयांचा टिप्पर आणि २० हजार रुपये किमतीची पाच ब्रास रेती असा एकूण २५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी टिप्परचालक व मालकाविरुद्ध भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.