फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव सहा वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:08 AM2018-07-20T01:08:22+5:302018-07-20T01:09:11+5:30
फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटाळा तलाव संवर्धनाचा प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
भाजपाचे आमदार सुधाकर देशमुख व डॉ. मिलिंद माने यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी फुटाळा तलावातील पाणी दूषित होत असल्याकडे लक्ष वेधले होते. यावर पर्यावरण मंत्री कदम यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, नागपूर महानगरपालिकेने फुटाळा तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव १८ जानेवारी २०११ रोजी सादर केला होता. राज्य शासनाने हा प्रस्ताव राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेंतर्गत केंद्र सरकारकडे १ आॅक्टोबर २०१२ रोजी मंजुरीसाठी पाठवला. सद्यस्थितीत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. तसेच फुटाळा तलवातील पाणी दूषित होत असल्याबद्दल त्यांनी सांगितले की, नीरी या संस्थेने सन २०१७-१८ या कालावधीकरिता तयार केलेल्या पर्यावरणीय सद्यस्थिती अहवालानुसार तलावाच्या प्रदूषण पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येत नाही.