सुरेश भट सभागृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव : स्थायी समितीकडे प्रस्ताव मंजुरीला पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 09:00 PM2019-12-28T21:00:51+5:302019-12-28T21:03:14+5:30
महापालिका प्रशासन सभागृहाची भाडेवाढ करण्याच्या विचारात असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. या निर्णयाला विविध संस्थांनी विरोध दर्शविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन मिळावे, सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांना कार्यक्रमांचे आयोजन परवडण्यासारखे असावे, यासाठी रेशीमबाग परिसरात सुसज्ज अशा सुरेश भट सभागृहाची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृहाचे केवळ पाच हजार रुपये भाडे घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार भाडे आकारणी होत आहे. परंतु महापालिका प्रशासन सभागृहाची भाडेवाढ करण्याच्या विचारात असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. या निर्णयाला विविध संस्थांनी विरोध दर्शविला आहे.
नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हौशी व सामाजिक संस्थांना केवळ पाच हजार रुपयात सभागृह उपलब्ध होते. गेल्या दीड वर्षांत अनेक संस्थांना त्याचा लाभ झाला. कार्यक्रमाचे आयोजन करणे सोयीचे झाले. मात्र आता महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने व सभागृहाचा खर्च बघता भाडे वाढवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. हौशी, सामाजिक संस्थांसाठी १० हजार रुपये तर व्यावसायिक संस्थांसाठी २५ ते हजार ४० हजारापर्यंत शुल्क घेण्यात यावे, असा हा प्रस्ताव आहे. पुढील महिन्यात स्थायी समिती समोर हा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या मालकीचे हे सभागृह असले तरी देखभाल व व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सभागृहातील वाहनतळ खासगी संस्थेला दिले आहे. शहरातील सभागृहाचे भाडे सेवाभावी संस्थांना परवडण्यासारखे नाही. अशा परिस्थितीत भट सभागृहाच्या भाड्यात वाढ झाल्यास अनेक संस्थांची अडचण होणार आहे.