कॅन्सर रुग्णांकडून शुल्क न आकारण्याचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:52 AM2018-03-09T00:52:55+5:302018-03-09T00:53:06+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पूर्वी कर्करोग (कॅन्सर), क्षयरोग, एचआयव्हीबाधित व सिकलसेलच्या रुग्णांकडून शुल्क आकारले जात नव्हते, परंतु जानेवारी महिन्यापासून शुल्काचे नवे दर लागू झाल्याने व यात कॅन्सरच्या रुग्णाकडून शुल्क आकारण्याच्या सूचना असल्याने रुग्ण अडचणीत आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पूर्वी कर्करोग (कॅन्सर), क्षयरोग, एचआयव्हीबाधित व सिकलसेलच्या रुग्णांकडून शुल्क आकारले जात नव्हते, परंतु जानेवारी महिन्यापासून शुल्काचे नवे दर लागू झाल्याने व यात कॅन्सरच्या रुग्णाकडून शुल्क आकारण्याच्या सूचना असल्याने रुग्ण अडचणीत आले. मेडिकल प्रशासनाने यात पुढाकार घेऊन कॅन्सरच्या रुग्णाकडून शुल्क आकारु नये, असा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मेडिकलच्या विविध शुल्कात जानेवारी २०१८ पासून २५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. नोंदणी शुल्क १० रुपयांवरून २० रुपये करण्यात आले. विविध चाचण्यासह, शस्त्रक्रिया, प्रसुती, वॉर्ड, अतिदक्षता विभागाच्या शुल्कात वाढ करण्यात आली. या शुल्काला घेऊन गरीब रुग्णांकडून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, विविध शुल्कातून काही गंभीर आजाराच्या रुग्णांना सूट देण्यात आली होती. यात कर्करोगाचा समावेश होता. परंतु नव्या दरपत्रकात त्यांचाही समावेश करण्यात आला. यामुळे रेडिओथेरपी, केमोथेरपी घेणाºया रुग्णांना पैसे मोजावे लागत आहे. मेडिकलच्या कर्करोग विभागात रोज १५० वर रुग्ण येतात. यातील ८० ते ९० रुग्णांवर रेडिओथेरपी तर ६० ते ७० रुग्णांवर केमोथेरपी केली जाते. परंतु बहुसंख्य रुग्ण हे गरीब व कॅन्सरच्या नावाने धास्तावले असतात. काही रुग्णांकडे नोंदणी करण्याएवढेही पैसे नसतात. अशावेळी हे रुग्ण पुढील उपचारापासून दूर राहतात. त्यांचा आजार बळावण्याची शक्यता असते. शुल्काला घेऊन रुग्णांच्या तक्रारीही वाढल्या. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी याला गंभीरतेने घेतले आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला मेडिकलच्या विविध शुल्कातून कर्करोगाच्या रुग्णांना वगळण्याचा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावावर वैद्यकीय शिक्षण विभाग काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.