नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव विचारधीन; डिसेंबरमध्ये मुंबईत अधिवेशन घेण्यावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 06:46 PM2017-12-20T18:46:56+5:302017-12-20T18:47:26+5:30
कामकाज समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कामकाज समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्याकडून लेखी सूचना मागविण्यात येणार आहे. सर्व लेखी प्रस्तावावर साधकबाधक चर्चा होऊन सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येणार आहे. सध्यातरी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.
बापट म्हणाले, सुरू असलेले अधिवेशन आणखी दोन आठवडे वाढवून चार आठवड्याचे घेण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी विधिमंडळ सभागृहात बुधवारी दुपारी झालेल्या बैठकीत केली. अधिवेशनाचा कालावधी वाढवायला हरकत नाही, पण विरोधक सभागृहात चर्चेच्या वेळात चर्चा करीत नाहीत. अनावश्यक वेळ घालवितात. आता अधिवेशनाचा कालावधी वाढविणे शक्य नाही. विदर्भाचा फायदा होईल, अशा अनेक विषयांवर दोन्ही सभागृहात विस्तृत चर्चा झाली आहे. आता अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याचे काहीही औचित्य नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. मुंबईत जुलै महिन्यात पाऊस असल्याने तेथील अधिवेशन नागपुरात घ्यावे व नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत डिसेंबरमध्ये अधिवेशन घेतले जावे असाही एक विचार यावेळी बोलून दाखवण्यात आला.