गडकरींच्या मेव्हण्याकडे घरफोडी

By admin | Published: April 18, 2015 02:26 AM2015-04-18T02:26:52+5:302015-04-18T02:26:52+5:30

डॉलरसह २३ लाखांचा ऐवज लंपास : सीपींना गुन्हेगारांची पहिली सलामी

Prosecuting to Gadkari's nuts | गडकरींच्या मेव्हण्याकडे घरफोडी

गडकरींच्या मेव्हण्याकडे घरफोडी

Next

नागपूर : उपराजधानीत गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. दिवसाढवळ्या लुटमार, घरफोड्या आणि खुनाच्या घटना घडून नागपूरकर भयग्रस्त झाले असतानाच पुन्हा शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मेव्हण्याकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. चोरट्यांनी डॉलर आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांसह २३ लाखांचा ऐवज चोरून नेला. पोलीस आयुक्त म्हणून उपराजधानीत फोफावलेल्या गुन्हेगारीला लगाम घालण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दाखल झालेल्या शारदा प्रसाद यादव यांना पहिल्याच दिवशी गुन्हेगारांनी अशी धाडसी सलामी दिली.
गडकरी यांचे मेव्हणे किशोर कमलाकर तोतडे (वय ५५) यांची सोलर सिस्टीम प्रा. लि. आहे. ते खामल्याच्या पांडे लेआऊटमधील रघुकूल अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर राहतात. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने ते १४ एप्रिलला कोलकाता येथे गेले होते. शुक्रवारी परत येणार म्हणून त्यांची पत्नी मनिषा तसेच मुलगा शंतनू त्यांना घ्यायला आपल्या कारने दुपारी १.३० वाजता घरून रेल्वेस्थानकाकडे निघाले. २५ मिनिटांनी ते घरी पोहचले. बघतात, तो त्यांच्या सदनिकेच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमधील साहित्य अस्तव्यस्त केले होते. सदनिकेतील १ हजार डॉलर, २ किलो चांदी तसेच लक्ष्मीहार, सोनसाखळ्या, चपलाकंठी, अंगठ्या आणि इतर असे ८१० ग्राम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच या घटनेची माहिती देण्यात आली.
सर्वत्र खळबळ
नवीन पोलीस आयुक्त एस. पी. यादव पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा त्यांच्या स्वागतासाठी अलर्ट होती.अशात चोरट्यांनी ही धाडसी घरफोडी करून नव्या आयुक्तांना ‘कडक सॅल्युट‘ ठोकला. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. प्रतापनगर ठाण्याचे एपीआय मारुती मुंडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर, उपायुक्त निर्मलादेवी एस यांच्यासह मोठा ताफा घटनास्थळी पोहचला. श्वान आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिसरात नाकाबंदीही करण्यात आली. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही.
२० मिनिटात साधला डाव
पोलिसांच्या माहितीनुसार, मनिषा आणि शंतनू हे मायलेक घरून १.३० वाजता रेल्वेस्थानकाकडे गेले. १.५३ ला ते घरी परत आले. त्यांना घराचा परिसर सोडण्यासाठी ३ मिनिटांचा वेळ लागला असेल. अर्थात परत ते फक्त २० मिनिटे घराबाहेर होते. अवघ्या २० मिनिटात २२.८० लाखांचा ऐवज लंपास केला.

Web Title: Prosecuting to Gadkari's nuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.