वकिलानं न्यायालयाबाहेर न्यायमूर्तींच्या कानशिलात लगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:38 PM2018-12-26T18:38:47+5:302018-12-26T18:39:59+5:30
निकालावर नाराज असल्यानं वकिलाचं कृत्य
नागपूर: न्यायालयाच्या आवारात एका वकिलानं सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या कानशिलात लगावल्याची घटना नागपुरात घडली. जिल्हा सत्र न्यायालयाच्या सातव्या मजल्यावरील लिफ्टबाहेर हा प्रकार घडला. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
वकील डी. एम. पराते यांनी आपल्या श्रीमुखात भडकावल्याची तक्रार सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती के. आर. देशपांडे यांनी पोलिसांकडे नोंदवली. 'पराते यांनी न्यायालयाच्या आवारात कानशिलात लगावल्याची तक्रार न्यायमूर्ती देशपांडे यांनी दिली आहे. देशपांडे यांनी एका प्रकरणात दिलेला निकाल पराते यांना पटला नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. यातूनच त्यांनी देशमुख यांच्या कानशिलात लगावली,' अशी माहिती पोलीस अधिकारी सुनील बोंडे यांनी दिली.
सध्या या घटनेचा तपास सुरू असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असं पोलिसांना सांगितलं. सरकारी अधिवक्ते नितीन तेलगोटे यांनी या घटनेचा निषेध केला. 'आरोपीनं असं वागायला नको होतं. त्याला एखाद्या निकालाबद्दल आक्षेप होता, तर त्यानं कायदेशीर मार्गानं दाद मागायला हवी होती. वकिलांकडून समाजाला अशा वर्तणुकीची अपेक्षा नाही,' असं तेलगोट म्हणाले.