समृद्धी झाला; पण नऊ वर्षे होऊनही पारडी उड्डाणपूल होईना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:15 PM2023-02-14T15:15:03+5:302023-02-14T15:16:45+5:30
बांधकाम साहित्य व मजुरांचा तुटवडा : कंत्राटदार कंपनीचे कासवगतीने काम
नागपूर : समृद्धी महामार्गाचा नागपूर- शिर्डी पर्यंतचा टप्पा पूर्ण झाला; पण नऊ वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या पारडी उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. कंत्राटदार कंपनीचे काम कासवगतीने सुरू आहे. विशेष म्हणजे बांधकामासाठी लागणारे साहित्य व मजूर देखील आवश्यकतेनुसार पुरविले जात नसल्याने कामाची गती मंदावली आहे.
२०१४ मध्ये या उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाले होते. पारडी चौकात बांधकाम सुरू असलेल्या रोटरीचे बांधकाम जून २०२१ मध्ये पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. यानंतर २०२२ मध्ये दोनवेळा काम पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला. मात्र, अद्याप काम पूर्ण झालेले नाही.
१९ ऑक्टोबर २०२१ रोजी पारडी ते कळमना दरम्यान पुलाचा एक भाग कोसळला होता. त्यावेळी कंत्राटदार कंपनीचा बेजबाबदारपणा उघडकीस आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदार कंपनी जसजसा निधी मिळेल तसतसे बांधकाम साहित्याचा पुरवठा करीत आहे. त्यामुळे बांधकाम साहित्य कमी पडत आहे. गरजेनुसार मजूरही कामावर लावले जात नाहीत, अशीही तक्रार आहे.