माझ्या गावाची समृद्धी, माझी जबाबदारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:23+5:302021-08-29T04:11:23+5:30
रोजगार हमी योजनेतून राबनार उपक्रम माझ्या गावाची समृद्धी, माझी जबाबदारी! रोजगार हमी योजनेतून राबविणार उपक्रम कळमेश्वर : ग्रामीण भागातील ...
रोजगार हमी योजनेतून राबनार उपक्रम
माझ्या गावाची समृद्धी, माझी जबाबदारी!
रोजगार हमी योजनेतून राबविणार उपक्रम
कळमेश्वर : ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली. ग्रामीण भागातील जनतेला गावातच रोजगार उपलब्ध करून स्थलांतर थांबवावे. रोहयो योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाश्वत स्वरुपाची मालमत्ता निर्माण करून मूलभूत व पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी दरवर्षी लेबर बजेट बनविले जाते; परंतु यावर्षी समृद्ध गाव अंतर्गत समृद्धी बजेट तयार करावयाचा आहे, त्यानुसार विविध योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थींना एकपेक्षा अधिक योजनेचा लाभ देऊन समृद्ध करणे, पर्यायाने गाव समृद्ध करणे हा मुख्य उद्देश आहे. याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कळमेश्वर पंचायत समितीतर्फे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप गोडशेलवार यांनी दिली.
मनरेगाच्या कामावर ग्रामीण भागातील कुटुंब वर्षानुवर्षे कामावर येऊनसुद्धा त्यांची आर्थिक परिस्थितीत काही सुधारणा होत नव्हती. आर्थिक स्थिती न सुधारल्याने ही कुटुंबे गरिबीतच अडकून राहिले. या सर्व स्थितीतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने शासनाने हे अभियान सुरू केले असून, लेबर बजेटऐवजी समृद्ध बजेट तयार करण्याचे नियोजन केले आहे. या बजेटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला समृद्ध करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे आधुनिक पद्धतीने शेतीमधून उत्पन्न काढून खर्च वजा जाता एक वर्षाचे उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक करणे होय. त्यातच शेतीसोबतच शेतीला पूरक इतर उद्योग, व्यवसाय जोडधंद्यातून निव्वळ नफा एक लाखापेक्षा जास्त वाढविणे या दृष्टीने ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला समृद्ध करण्याचा शासनाचा संकल्प आहे.
समृद्ध बजेट तयार करण्याच्या दृष्टीने पंचायत समिती कळमेश्वर अंतर्गत ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, सरपंच यांचे तीनदिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये समृद्ध बजेट कसे तयार करायचे या अनुषंगाने माहिती देण्यात आली. तसेच ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत गावातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबाच्या प्रत्यक्ष गृहभेटी घेऊन सर्व्हे करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामस्थापर्यंत या योजनांची माहिती पोहोचविण्यात आली आहे.
मागेल त्याला काम
कामाची मागणी ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे करायची व कामाच्या मागणीची पोहोच घ्यायची, काम मागणी केल्यावर पंधरा दिवसांत गावातच काम सुरू होते, कामाच्या ठिकाणी मस्टरवर रोज हजेरी, दर आठवड्याला कामाचे मोजमाप, दर पंधरा दिवसांच्या आत मजुरी, मजुरी आपल्या बँक किंवा पोस्ट खात्यावर जमा होते.
पोस्ट बँक खाते नवीन खाते झिरो बॅलन्सवर काढता येईल.
या खात्यातील रक्कम देणे घेणे हे व्यवहार आपल्याला गावातील पोस्टमन आणि शहरातील पोस्टातदेखील करता येणार आहे.
कामाच्या ठिकाणी सुविधा
सावली, पिण्याचे पाणी, प्राथमिक औषधोपचारपेटी, पाळणाघर, दरफलक आवश्यक राहील.
सार्वजनिक लाभाची कामे
वनतळे, वृक्षलागवड, माती नालाबांध, गाव तलाव, ग्रामपंचायतसाठी विहीर, रस्ता, वृक्षारोपण, क्रीडांगण, भूमिगत बंधारे, जलाशयातील गाळ काढणे, रोपवाटिका, जंगलातील जाळ रेषा, कालव्याचे नूतनीकरण, वनबंधारे, पडिक गायरान जमिनीवर वृक्षलागवड, बंधारे रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड, वृक्षसंगोपन, सलग समतल चर, सार्वजनिक वनजमीन पट्ट्यांचा विकास.
वैयक्तिक लाभाची कामे
सिंचन विहीर, रोपवाटिका, शोषखड्डा, फळबाग, व्हर्मी कम्पोस्टिंग, शेततळे, नाडेप कम्पोस्टिंग, शौचालय, वृक्षलागवड, बांध दुरुस्ती, दगडी बांध, घरकूल, गोठा, कुक्कुटपालन शेड, वैयक्तिक वनजमीन पट्ट्यांचा विकास.